मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ओवळा, ऐरोली विधानसभा मतदारसंघ संवेदनशील
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ओवळा, ऐरोली आदी तीन विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असल्याचे निदर्शनास आणून, या विधानसभा मतदारसंघातील नोडल अधिकाऱ्यांनी मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा आणि सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले आहेत.
देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुकीचे मतदान येत्या २० मे २०२४ रोजी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी, २४-कल्याण आणि २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका निःपक्षपातीपणे, शांततेत आणि भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, २४- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, २५-ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना आणि राहील गुप्ता तसेच ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी, २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, २४-कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, २५-ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये, नोडल अधिकारी (कायदा- सुव्यवस्था) दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी (आदर्श आचारसंहिता) विजयसिंह देशमुख यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक-२०२४ करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या ‘क्यू-आर कोड'च्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच ‘सी-व्हिजिल ॲप'च्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी जाणून घेतले.
या बैठकीत प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी, सूत्रसंचलन मुख्य वित्त-लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी तर आभारप्रदर्शन एकत्रित मीडिया कक्ष, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले.