वाशीतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून वाशी, सेवटर-६ मधील मिनी मार्केट येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ‘भाजपा'चे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, ‘भाजपा अनुसूचित जाती मोर्चा'चे माजी जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक प्रताप भोसकर यांनी सदर महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घ्ोतली. लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स यांच्या सहकार्याने तसेच मयुरेश हॉस्पिटल तुर्भे यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
२८ वर्षापूर्वी मी नगरसेविका म्हणून निवडून आली, तेव्हापासून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. जनतेची आणि वयोवृध्द नागरिकांची सेवा करण्यास मला संधी मिळत असल्याने ते कार्य मी पुढे सुरूच ठेवणार आहे. हवामानातील बदलामुळे उद्भवलेल्या सर्दी, ताप अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून मोफत महाआरोग्य शिबिराची संकल्पना मी प्रत्येक विभागात नागरिकांसाठी उपलब्ध करत आहे. त्याअंतर्गत वाशी, सेवटर-६ येथे भारतीय जनता पार्टी, लॉयन्स कल्ब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स आणि मयुरेश हॉस्पिटल तुर्भे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
आरोग्य शिबिराला मिळालेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून मला समाधान वाटत आहे. वाशी येथील माझे अनेक सहकाऱ्यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर आयोजित केले. वाशी येथील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, अस या शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश आहे. आज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग शिबिराचा लाभ घेत आहेत. वाशी येथील नागरिकांनी अशा रितीने सहकार्य केल्यास लवकरच वाशी शहर रोग मुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.