मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उन्हात थंडगार ‘निरा' पिण्याकडे नागरिकांचा वाढता कल
उरण : सध्या कडक उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत गेलेला आहे. त्यात महामार्गावरुन प्रवास करताना उन्हासोबत तापलेल्या रस्त्याचे चटके बसत असल्याने नागरिक हैराण होत असून, तहानेने व्याकुळ होत आहेत. मात्र, उरण-पनवेल महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांची सध्या सुमधुर ‘निरा' तहान भागवत आहे. उरण पासून पनवेल पर्यंत रस्त्यावर ‘निरा' विक्रीचे स्टॉल लागलेले दिसत असून, नागरिक वाहने पार्क करुन ‘निरा' पिण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाण्यासोबत ‘निरा' पेय देखील निसर्गाचा चमत्कार समजले जाते. ताड, माड, खजुरी, शिंदी या झाडांमधून पाझरणाऱ्या द्रवालाच असे संबोधले जाते. ‘निरा' द्रव मनुष्याला पोषक आणि उपायकारक ठरत आहे. अनेकांना ताडी अथवा माडी म्हणजे नशा आणणारे पेय वाटते. त्यामुळे नव्याने पिणारे अनेकजण काहीसे संशयानेच ‘निरा' पेय पिताना दिसतात. मात्र, एकदा मधुर निरा पेयाचा घोट पोटात गेल्यावर म्हणणारा ग्राहक हक्काने दोन ग्लास जादा पितो इतके ‘निरा' पेय लज्जतदार आणि शरीराला तजेला देणारे आहे. ताड, माड, खजुरी, शिंदी आदी झाडे उपलब्ध असलेली गावे, तालुक्यांमध्ये तसच आसपासच्या मोठमोठ्या शहरांमध्ये ‘निरा' विकण्यासाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. कोकणात ‘निरा' पेय जास्त प्रमाणात आढळते. सर्वत्र शीतपेये, सरबते, लस्सी, ताक यांसारखे तहान भागवण्याचे अनेक पर्याय सहज उपलब्ध होऊ लागल्याने काळाच्या ओघात ‘निरा' केंद्रांची संख्या मात्र खूपच कमी होत गेली होती. मात्र, उरण -पनवेल मार्गावर शासनाने ‘निरा' विक्री करण्यास दिलेल्या परवानगीमुळे ‘निरा' विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. निरा विक्री केंद्रात २०० एमएल १५ रुपये या दराने ‘निरा' विकली जात आहे .
निरा पिल्याने खूप फायदे आहेत. निरा स्वास्थवर्धक थंड पेय आहे. ‘निरा' पचन क्रियेस, रक्त वाढविण्यास मदत करते. गर्भवती महिलेला ‘निरा' लाभदायक आहे. निरा थकवा घालवते, पोटातील विकार दूर करते. निरा उपवासाला चालते. ‘निरा' प्यायल्यावर तरतरी, तजेला वाटतो. निरा पेयाची पौष्टिकता तिच्यातील फॉस्फरस, लोह, साखर, जीवनसत्व ‘क', ‘ब १' ‘ब २' आणि नायसिनवर अवलंबून असते. ‘निरा' मध्ये घालण्यात येणाऱ्या खाण्याच्या चुन्यामुळे शरिराला कॅल्शिअम देखील मिळते, असे ‘निरा' विक्रेते सांगतात.
अनेक अपायांवर आणि त्वचेच्या विकारांवर औषधी गुणधर्म असलेल्या निरा पेयाचा फायदा होतो. त्यामुळे ‘निरा' पेय पिणे सर्वच पसंत करत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘निरा' मध्ये पौष्टिक घटक असल्याने नागरिक पिणे पसंत करतात.महागड्या कृत्रिम शितपेयांच्या तुलनेत वैशिष्ठयपूर्ण चवीमुळे आणि स्वस्त किमतीमुळे ‘निरा' तग धरुन आहे. झाडाला बांधण्यात आलेल्या मडक्यामध्ये गोळा झालेल्या निरा पेयावर सूर्यकिरण पडताच ती आंबण्याची क्रिया सुरू होते. या आंबण्याच्या प्रक्रिये दरम्यान ‘निरा' मधील मौल्यवान जीवनसत्त्व नष्ट होतात, शिवाय ती शरीराला अपयायकारही ठरतात. त्यामुळे ‘निरा' सकाळीच सूर्योदयापूर्वी झाडावरुन काढली जाते.