ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
एमआयडीसी वसाहतीत पाणी टंचाई
वाशी : नवी मुंबई मधील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने या क्षेत्रतील अनेक उद्योगांना टँकर मधील पाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘पाणी टंचाई'ची परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर भविष्यात येथील उद्योगांना घर-घर लागण्याची भीती नवी मुंबई मधील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांनी वर्तवली आहे.
नवी मुंबई मधील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी'च्या बारवी धरणातून रोज ५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. तर याच बारवी धरणातून अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतील काही रहिवासी भागात देखील पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातून रोज पाच औद्योगिक वसाहतींमध्ये पाणी पुरवठा केला जातो. मात्र, याच औद्योगिक भागात मागील १०-१२ वर्षांपासून कमालीचे नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींची पाण्याची मागणी जरी मर्यादित असली तरी वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत चालली आहे. त्याचा ताण पाणी पुरवठ्यावर होत असून, आज औद्योगिक वसाहतींना पाणी अपुरे पडत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.
सध्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील ४० ते ४५ उद्योजक रोज ‘एमआयडीसी'च्या महापे कार्यालयात पाण्यासाठी मागणी अर्ज करतात. पाण्यासाठी अर्ज करणाऱ्या उद्योजकांना एमआयडीसी द्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येते, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. तर पाणी पुरविण्याची मागणी करणाऱ्या उद्योजकांपेक्षा दुपटीने उद्योग व्यवसायिक वापरासाठी खाजगी टँकर द्वारे पाणी घेतात. अजून एप्रिल आणि मे महिना शिल्लक असल्याने पाणी टंचाई अधिक भीषण होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची विद्यमान परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर भविष्यात टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना घर-घर लागण्याची भीती लघु उद्योजक वर्तवित आहेत.