जगप्रसिध्द घारापुरी बेटावर पाणी टंचाईचे संकट
डिसेंबर महिना अखेरीस धरणाच्या पाण्याच्या पातळीने गाठला तळ
उरण : यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे जगप्रसिध्द घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच पुरती खालावली आहे. परिणामी, घारापुरी बेटावर डिसेंबर पासूनच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पर्यटक, बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायत तर्फे राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावरील जगप्रसिध्द कोरीव लेण्या पाहण्यासाठी दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदि लघुउद्योग आहेत. या सर्वांना पाणी पुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. या धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायत मार्फत पुरविण्यात येते. दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिल्लक राहणारा पाणीसाठा यंदा मात्र कमी पावसामुळे झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याअखेरीसच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. जेमतेम पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना पाणी पुरवठा कसा करावा? असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतला पडला आहे.
घारापुरी बेटावर टॅकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, उरण गटविकास अधिकारी, उरण तहसीलदार यांच्याकडे केली आहे.