मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
ऐरोली खाडीकिनारी मृत माशांचा खच
वाशी: नवी मुंबई शहरातील ऐरोली खाडीत रासायनिक प्रदूषणाची मात्रा वाढत चालली असल्याने मागील दोन-तीन दिवस ऐरोली खाडी किनारी मृत माशांचे प्रमाण वाढत चालले आहे.
नवी मुंबई शहरातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लहान-मोठ्या रासायनिक कारखान्यांतील दूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका दरवर्षी जलचरांना बसत आहे. दरवर्षी ऐरोली खाडीसह आजूबाजूच्या खाडीतील वाढत्या रासायनिक प्रदूषणामुळे खाडीतील मासे मृत पावत आहेत.
औद्योगिक वसाहतीमधून विनाप्रकिया केलेले रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील माशांच्या प्रजननावर परिणाम होऊन खाडीतील मासळीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यात अधून-मधून अति घातक रसायन पाण्यात मिश्रित झाल्यास मासे मृत पावतात. रसायन मिश्रित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत होण्याच्या घटना वरचेवर घडत असतात. मात्र, याकडे प्रशासन कधीच गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे.
रसायन मिश्रित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत होण्याचा प्रकार पुन्हा एकदा ऐरोली मध्ये घडला असून, ऐरोली खाडीतील हजारो मासे मृत पावले आहेत. वाढते तापमान आणि रासायनिक प्रदूषणाने ऐरोली खाडीतील हजारो मासे मृत पावण्याचा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच माशांचे प्रमाण कमी झाले असून, ऐरोली खाडीतील हजारो मासे मृत होण्याच्या प्रकाराने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऐरोली खाडीत शेकडो मासे मृत पावत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. खाडीतील प्रदूषण वाढल्याने पाण्याचे तापमान वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे खाडीतील मासे मृत पावत आहेत, असे स्थानिक मच्छिमार सांगत आहेत. मृत पावलेल्या माशांमध्ये काळा मासा, जिताडा, कोळंबी, बोईस, चिंबोरी, निवट्या आदी विविध प्रकारच्या माशांचा समावेश आहे. सदर मासे घणसोली, तळवली, गोठिवली, दिवा कोळीवाडा आणि ऐरोली खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. रासायनिक सांडपाणी, दलदल तसेच जैविक कचऱ्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याची येथील मच्छिमारांची तक्रार आहे.
ऐरोली खाडी प्रदूषित झाली असली तरी प्रशासन फारसे गंभीर नाही, असा आरोप नेहमीच स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरण प्रेमी करत असतात. तीन दिवसांपासून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे जाळ्यात अडकलेले सदर मासे मृत अवस्थेत होते, अशी मच्छी आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास अयोग्य असल्याने मच्छीतार ती विकत नाहीत. खाडीतील मासे मृत होण्याचा प्रकार दरवर्षी घडतो. याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे डास मारण्यासाठी कांदळवनात फवारणी करणे तसेच रासायनिक रंग असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जन आहे, असा दावा मच्छीमार दिनकर पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घ्ोत ऐरोली खाडी परिसरात जैविक कचरा देखील टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. काळा मासा, कोळंबी, जिताडा, खेकडा आदी सर्वच प्रकारचे मासे ऐरोली खाडी किनारी मृत अवस्थेत आढळून आले. ऐरोली खाडीत मासेमारी करुन जवळपास ५० मच्छिमार उदरनिर्वाह करीत आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून जाळ्यात मृत मासे आढळून येत असल्याने मासेमारीवर उदरनिर्वाह चालणाऱ्य मच्छिमारांचे एक-दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, यावर नुकसान भरपाई देखील मिळत नसल्याची नाराजी मच्छिमार बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे एसआरओ सचिन अडकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
रात्री-अपरात्री एमआयडीसी मधील रासायनिक उत्पादन आणि वापर करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी रासायनिक पाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडतात. त्यामुळेही खाडीतील मासे मृत होण्याची घटना घडते. गेल्या सलग तीन दिवसांपासू जाळ्यात मृत मासे येत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका ऐरोली विभाग अधिकाऱ्यांची भेट घ्ोण्यासाठी गेलो असताना निवडणूक कामामुळे त्यांच्याशी भेट झाली नाही. - दिनकर पाटील, मच्छिमार - ऐरोली.