वाशी आरटीओ कार्यालयाचे कामकाज अखेर नव्या इमारत मधून सुरु

शासनाला सापडेना उद्‌घाटनाचा मुहूर्त  

वाशी : नवी मुंबईतील वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाची जागा भाड्यातत्वावर असून, सदर इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरुळ मधील नवीन आरटीओ कार्यालय इमारतीत १० जानेवारी पासून प्रत्यक्ष कामकाजाला  सुरुवात करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९९९-२००० साली  वाशी मध्ये तात्पुरत्या स्वरुपात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले होते. सदर कार्यालय पामबीच मार्गावरील शिव सेंटर इमारतीत होते. येथून ठाणे आरटीओ कार्यालय अंतर्गत काम चालत होते. त्यानंतर २००४ साली नवी मुंबई शहरासाठी स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना करुन वाशी मधील एपीएमसी धान्य बाजारात भाड्याच्या जागेत वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सुरु करण्यात आले.

दरम्यान, वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून ‘सिडको'कडून नेरुळ सेक्टर-१३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र, सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने उशीर केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवर मात करत अखेर २०१९ मध्ये वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर अल्पावधीतच नेरुळ येथील वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाची इमारत बांधून तयार झाली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून या इमारतीच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त शासनाला सापडत नाही. त्यामुळे वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाची इमारत तयार असून देखील आरटीओ कार्यालयाचा कारभार जुन्या जागेतून चालत होता. मात्र, एपीएमसी धान्य बाजारातील वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या छताचे प्लास्टर वारंवार पडण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी इमारतीच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या वाढत्या घटना पाहता सुरक्षेच्या कारणास्तव १० जानेवारी पासून नेरुळ मधील नवीन इमारतीतून आरटीओ कार्यालयातील कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी काही दिवसातच राज्य शासनाकडून सुधारीत वेळ घेऊन नेरुळ मधील वाशी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या इमारतीचा शासकीय लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती वाशी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नागरी सेवा सुविधांचे भूखंड भांडवलदारांना विकण्यासाठी सिडको आणि महापालिका सज्ज