मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
७०० पेक्षा अधिक बिगर गाळाधारक व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण लांबणीवर
तुर्भे ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारातील ७०० पेक्षा अधिक बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे. दरम्यान, बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे लवकरात लवकर नूतनीकरण झाले नाही, तर आंदोलन करण्याचा निर्णय बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
एपीएमसी घाऊक फळ बाजार आवारात व्यवसाय करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चा परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यापारासाठी व्यापाऱ्यांना गाळे वाटप करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वच व्यापाऱ्यांना गाळा देणे शक्य नाही. त्यामुळे सध्या गाळाधारक आणि बिगरगाळाधारक व्यापारी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी स्वतःचा गाळा नसलेल्या व्यापाऱ्यांना ओपनशेड मध्ये व्यापार करण्यास जागा उपलब्ध करुन दिली जाते. ओपनशेड मध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय परवान्यांचे वार्षिक नूतनीकरण करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. त्यानुसार एपीएमसी फळ बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती' प्रशासनाकडे जमा करुनही अद्याप त्यांच्या व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण झाले नाही. व्यवसाय परवाना नूतनीकरण झाले नाही तर व्यापाऱ्यांना एपीएमसी बाजारात व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.
दरम्यान, एपीएमसी बाजारातील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवाना नूतनीकरणाबाबत चर्चा सुरु आहे. व्यापाऱ्यांसोबत याबाबत बैठक झाली आहे. लवकरच बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत तोडगा काढला जाईल, अशी माहिती ‘एपीएमसी फळ बाजार'च्या उपसचिव संगीता अडांगळे यांनी दिली.