महापालिका नुतन मुख्यालयाचे काम प्रगतीपथावर

पनवेल : पनवेल महापालिकेची भव्य-दिव्य नवीन मुख्यालय वास्तू खांदा कॉलनी येथील ब्रीज लगत काळसेकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उभारली जात आहे. या मुख्यालयाच्या कामाचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी घेतला. यावेळी आयुवत डॉ. रसाळ यांनी महापालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तळमजला अधिक सहा मजली असणाऱ्या या मुख्यालय इमारतीचे सध्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरु आहे. सुमारे ४ लाख ८ हजार ६३ चौरस फुट क्षेत्रफळामध्ये महापालिका मुख्यालयाची नवीन इमारत बांधली जात आहे. सदर मुख्यालय वास्तू इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्या प्लॅटिनम रेटिंगची ग्रीन बिल्डींग होणार आहे. त्यादृष्टीने या इमारतीची संकल्पना वास्तूविशारद हितेन सेठी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. त्याच पध्दतीने या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य वापरते जात आहे.

या वास्तुमध्ये २२४ आसन क्षमता असलेले महापालिका मुख्य सभागृह, एक बहुद्देशीय सभागृह, २ समिती सभागृहे, टेरेसवर आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे.

या इमारती मधील २ स्वागतकक्ष आणि पार्किंग येथील दोन पिलर्स मधील अंतर जास्त असल्यामुळे या ठिकाणी ग्रीड स्लॅब, वाईडेड स्लॅब, पोस्ट स्टेस पध्दतीचे स्लॅब टाकण्यात येत आहेत.  इमारतीचे स्थापत्य विभागाचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून स्थापत्य संबंधीचे सर्व काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा विश्वास प्रकल्प अभियंता संजय कटेक यांनी दिला आहे. त्याअनुषंगाने आयुवत डॉ. प्रशांत रसाळ यांनी यावेळी कंत्राटदाराला देखील सूचना केल्या असून त्याबाबत दैनंदिन नियोजन करण्यात आले आहे. या कामाच्या दैनंदिन तांत्रिक बाबींकरिता स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती पनवेल महापालिकेने केली आहे. मुख्यालय इमारतीच्या कामाचा दर्जा सर्वोत्तम रहावा याकरिता वेळोवेळी व्हीजेटीआय या नामांकित शासकीय महाविद्यालयाच्या विशेष तज्ञांकडून त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केले जात आहे. या कामातील स्टील आणि सिमेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि दर्जेदार पुरवठा करणाऱ्या कंपनीकडूनच घेणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती प्रकल्प अभियंता संजय कटेकर यांनी दिली आहे. इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे पाहून आयुक्त डॉ. रसाळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, भविष्यात स्थापत्य कलेचा अव्दितीय उदाहरण म्हणून गणली जाणारी महापालिका मुख्यालयाची इमारत पनवेलकरांची अस्मिता ठरणार असल्याने इमारतीचे काम वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. रसाळ यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उलवे मधील बालाजी मंदिरासाठी सीआरझेड मंजुरीविरोधातील याचिका मान्य