लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिसांनी आपल्या हद्दीतील गुन्हेगारांवर तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांंविरोधात कारवाई करण्यासाठी ६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत २७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासोबतच ६६३ परवानाधारकांची शस्त्र जमा करण्यात आल्याची माहिती विशेष शाखाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.  

लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई, ठाणे येथे ५ व्या टप्प्यात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. निवडणुकीवेळी अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून या मंडळींवर पोलिसांद्वारे करडी नजर ठेवण्यात येत असून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.  

आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत २७० जणांवर कलम १०७ आणि ११० प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची संख्या मोठी आहे. पोलिसांकडून आणखी काही गुन्हेगारांची झाडाझडती सुरु असून येत्या महिन्याभरात आणखी काही गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.  

दरम्यान, शहरातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा गुन्हे अभिलेख तपासून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतून ६ गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून पोलिसांकडून अद्याप १५ ते २० गुन्हेगारांची झाडाझडती सुरु असल्याचे पोलीस उपायुवत प्रशांत मोहिते म्हणाले.  

विशेष म्हणजे आचारसंहितेचे पालन करण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून या भरारी पथकाच्या माध्यमातून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे कामोठे आणि पनवेल शहर या दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
 
निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राखीव बल आणि होमगार्डची अधिक कुमक देखील राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून मागविण्यात आली आहे. नागरिकांना कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी पोलिसांकडे अथवा ‘निवडणूक आयोग'च्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार करावी. या तक्रारीवर तत्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-प्रशांत मोहिते, पोलीस उपायुवत-विशेष शाखा, नवी मुंबई.

अंमली पदार्थ , मद्यविक्रेत्यांवर कारवाई...
निवडणुकीच्या काळात दारुची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. दारुच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत. आतापर्यंत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन दारु विक्रेत्यांवर तसेच गावठी हातभट्टीची दारु गाळणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी छापेमारी करुन ३.५४ लाख रुपये किंमतीची ३,४०९ लिटर दारु जप्त केली आहे.  

त्याचप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांविरुध्द देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात ७.६६ लाख रुपये किंमतीचा ३७.३९६ किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच ५५.६८ लाख रुपये किंमतीचा १.८५६ किलो चरस, २९.९० लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम एमडी तर ९.८० लाख रुपये किंमतीचे २१४ ग्रॅम एलएसडी असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.  


शस्त्र जप्तीची कारवाई...
निवडणूक आचारसंहिता काळात परवानाधारकांनी आपले शस्त्र संबंधित पोलीस ठाणे मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीतील ६६३ परवानाधारकांची शस्त्र जमा केली आहेत. त्याशिवाय अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची देखील पोलिसांनी धरपकड केली असून आतापर्यंत पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारची २३ शस्त्रेे जप्त केली आहेत. यात पिस्टल ४, गावठी कट्टा ३, रिव्हॉल्वर १, तलवार ९, चॉपर १, सुरा-चाकू ५ आणि जिवंत काडतुसे १८ आदि शस्त्रांचा समावेश आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

फादर ॲग्नेल स्विमिंग पूल मधील विद्यार्थ्याचे मृत्यूप्रकरण