दि.बा. पाटील साहेब जयंतीदिनी ‘दिबा गुणीजन सन्मान २०२४' चे वितरण
नवी मुंबई : लोकनेते दि.बा. पाटील साहेबांची ९८ वी जयंती आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचा १२ वा वर्धापन दिन शेतकरी समाज मंदिर कोपरखैरणे येथे मोठ्या उत्साहात आणि संयुक्तरित्या आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी समाजातील गुणीजनांचा सन्मान आणि हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे ह्यांचे ‘सुदृढ पालक सुदृढ समाज' ह्या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानही संपन्न झाले.
या वर्षीच्या ‘दिबा गुणीजन सन्मान २०२४' चे पहिले मानकरी ठरले वाशी खाडी पुलाजवळ शेकडो बुडणाऱ्यांचे प्राण वाचवणारे वाशी गावचे आगरी कोळी सुपुत्र महेश सुतार ह्यांचा ‘दिबा गुणीजन सन्मान २०२४' हा मानाचा सन्मान युवा नेते वैभव नाईक ह्यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. आयुष चिकित्सा पद्धती मधील ॲवयपंवचर ह्या क्षेत्रात गेली २२ वर्षे उल्लेखनीय कामगिरी शिरवणे गावाचे सुपुत्र डॉ सुरेन्द्र पाटील ह्यांनाही यंदाचा ‘दिबा गुणीजन सन्मान २०२४' हा मनाचा सन्मान नवी मुंबईतील ज्येष्ठ सर्जन डॉ रवींद्र म्हात्रे ह्यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे ह्यांच्या ‘सुदृढ पालक सुदृढ समाज' ह्या प्रबोधनपर विषयावरील व्याख्यानाला शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी हशा आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सदर प्रसंगी फाऊंडेशनला विनामूल्य सहकार्य करणारे ॲड एच बी पाटील आणि असोसिएट्सचे ॲड समीर पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे डॉ विवेक भोईर, वैद्यकीय क्षेत्रात कार्य कारणारे डॉ रविंद्र म्हात्रे, कला क्षेत्रात कार्य करणारे राकेश नाईक, रंजिता म्हात्रे, प्रदीप म्हात्रे आणि कुटुंबिय, धवलारीन अवनि पाटील, खारी कळवा शेतकरी संघटना, आगरी कोळी मेडिकोज, उरण सामाजिक संस्था, गावदेवी शेतकरी संघटना-अंजुर दिवे भिवंडी, ठाणे कोळीवडा गावठाण पाडा समिती, शिवराज्य प्रतिष्ठान, पंचमहाभूत, तसेच उरण पनवेल ते ठाणे भिवंडीपर्यन्तच्या अनेक संघटना प्रतिनिधींचा सन्मान तसेच, आगरी-कोळी युत फाऊंडेशनला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या २८ गावातील गावनिहाय गाव टीमचा सन्मानही ह्यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून केला गेला.
सदर प्रसंगी संजय घरत, दिपक पवार आणि सचिन यादव ह्यांच्या विश्वरंग प्रॉडक्शन च्या माध्यमातून लोकनेते दि.बा. पाटील साहेब ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लोकनेते ह्या चित्रपटाचे टिझर लाँचही ह्यावेळी करण्यात आले. आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली १२ वर्ष सुरू असलेल्या भूमिपुत्र चळवळीला साथ आणि आशीर्वाद देणारा महिला वर्ग, पत्रकार बांधव, सर्व सामाजिक राजकीय आणि सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांचे, सर्व टिम मेंबर्सचे आणि विनामूल्य हॉल उपलब्ध केल्याबद्दल शेतकरी संघटनेचे ऋण व्यक्त करून तसेच भविष्यातही फाऊंडेशन सोबत सर्वांचे आशीर्वाद कायम राहतील असा विश्वास व्यक्त करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.