मान्सूनपूर्व आढावा बैठकीत यंत्रणांच्या समन्वयावर चर्चा

ठाणे : नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचेच मुल्यांकन होईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ९ मे रोजी मान्सूनपूर्व आढावा बैठक नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे संपन्न झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख आदि उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसिलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, एमआयडीसी, एमएमआरडीए, एसटी महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुध्द ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायन्स क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी सदर बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली.

प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत...      

पावसाळा सुरु होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे. या वेळेचा उपयोग करुन सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढण्यात यावा, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली. आपत्तीच्या काळात अफवा पसवल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ त्याचे खंडन करुन वास्तव स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी बल्क एसएमएस, समाज माध्यमे, प्रसारमाध्यमांची मदत घेण्यात यावी, असेही राव यांनी सांगितले. एकत्रित नियंत्रण कक्षात महापालिका, पोलीस, महावितरण यांचे प्रतिनिधी २४ तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील. त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणे सोपो होईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले महापालिका आणि पोलीस यांचे १६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे कार्यरत राहील, त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल, यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावी, असेही आयुक्त राव म्हणाले.

रेल्वे मार्गावरील पुलाची दुरुस्ती...

कोपरी येथे रेल्वे मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल ‘रेल्वे'च्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी परवानगी दिल्यास सदर दुरुस्तीचे काम महापालिका मार्फत करण्यात येईल, असेही राव यांनी सांगितले.

भंगार, बेवारस वाहनांच्या विरोधात मोहीम...

रस्त्यावर असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. जप्त वाहने ठेवण्यासाठी जागा शासनाकडून उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रहदारीस असलेले अडथळे दूर होतील. पुढील १५ दिवसात सदर मोहीम राबवावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पावसाळ्यात कोणतेही मोठे खोदकाम टाळावे. खोदलेला भाग पूर्ववत करुन वाहतूक योग्य करावा. खोदकाम अत्यावश्यक असल्यास त्यासभोवती व्यवस्थित बॅरिकेडिंग केले जावे, अशा सूचनाही आयुक्त राव यांनी बैठकीत दिल्या.

 माजिवडा-कापूरबावडी पलायओव्हरचे काम करण्यात आले असून मानपाडा आणि पातलीपाडा पलायओव्हरच्या कामासाठी परवानगी मिळालेली नसल्याचे ‘एमएसआरडीसी'च्या प्रतिनिधींनी सांगितले. तर गायमुख येथील घाट रस्त्याचे कामही वन विभागाच्या परवानगीअभावी सुरु होऊ शकलेले नाही. या पावसाळ्यात सदर मार्ग सुस्थितीत राहील याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क'ला पर्यटकांची पसंती