बारावे घनकचरा प्रकल्पात  पुन्हा आग

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. ३१ मार्च रोजी याच प्रकल्पाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. यातून या प्रकल्पामध्ये दुरुस्ती करण्यात येऊन १० एप्रिल रोजी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. त्याला २४ तास होत नाहीत तोवर पुन्हा एकदा बारावे घनकचरा प्रकल्पाला आग लागली आहे.

या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तर या प्रकल्पाला स्थानिक रहिवासी नागरिकांनी सुरवाती पासूनच विरोध केला आहे. यामुळे सदर प्रकल्प वादात सापडला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले.

११ एप्रिल रोजी पुन्हा बारावे घनकचरा प्रकल्पाला आग लागली. याबाबत वारंवार कल्याण-डोंबिवली महापालिकेला निवेदने देण्यात आली आहेत. बारावे घनकचरा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पण, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा परिसरातील सर्व नागरिक सदर प्रकल्प बंद पाडतील, असा इशारा ‘बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्था'चे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी दिला आहे.

वारंवार या कचरा प्रकल्पाला आगीच्या घटना घडून रहिवाशांना त्रास होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करणे अपेक्षित आहे. परंतु, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी याला जबाबदार असून प्रकल्प नियमाप्रमाणे चालवता येत नसेल तर तो त्वरित बंद करावा. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण १३ बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर बाकीचे प्रकल्प अजुन का चालू झाले नाहीत? असा सवाल सुनील घेगडे यांनी उपस्थित केला आहे.  
कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, आंबिवली, टिटवाळा, २७ गावे, आदि सर्व ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिम येथेच का आणला जात आहे. ज्या प्रभागात कचरा निर्मिती होते, तेथे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. परंतु, फक्त कल्याण पश्चिम मधील नागरिकांवरच अन्याय केला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

प्रकल्प पुन्हा कार्यान्वित अन्‌ २४ तासात पुन्हा आगीची घटना
बारावे  घनकचरा  प्रकल्पातील कचऱ्यास आग लागल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली होती.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रिक टन  प्रतिदिन सुका कचरा येत होता. येथील कचऱ्याचे वर्गीकरण करुन तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविण्यात येत होता. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविण्यात येते. असा सुमारे १५०० मॅट्रिक टन कचरा बारावे प्रकल्पस्थळी साठविण्यात आला होता. या साठविण्यात आलेल्या सुवया कचऱ्याला ३१ मार्च रोजी पहाटे आग लागली होती. या आगीमध्ये प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट आणि शेडच्या छताचे पूर्णपणे नुकसान झाले होते. प्रकल्पातील कचरा अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीवर त्वरित नियंत्रण करणे आवश्यक होते. त्यामुळे ६ फायर टेंडर आणि ८ पाण्याचे टँकर्स वापरुन आगीवर नियंत्रण करण्यात आले. सदर आगीच्या घटनेवेळी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी घटनास्थळास भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले होते. तसेच महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता घनःश्याम नवांगुळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या निर्देशानुसार वेगवेगळी पथके तयार करुन आगीवर नियंत्रण करण्याचे काम करण्यात आले. आगीच्या घटनेनंतर सदर प्रकल्प बंद होता. याठिकाणी दुरुस्तीचे काम केल्यानंतर अखेर १० एप्रिल रोजी सदर प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. पण, ११ एप्रिल रोजी पुन्हा येथे आग लागल्याची घटना घडली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मध्ये रमजान ईद साजरी