महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
विजेच्या धक्काने १३ वर्षीय मुलाने गमावली ३ बोटे
नवी मुंबई : सानपाडा, सेक्टर-४ येथील स्वामी मोहनणंद गिरीजा महाराज आणि स्वामी विवेकानंद संकुल क्रीडा मैदान येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम मे. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंत्राटदार कंपनीमार्फत सुरु आहे. १८ मार्च रोजी सदर ठिकाणी बांधकाम सुरु असताना तिथे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्युत तार (इलेक्ट्रिक वायर) उघड्यावर पडली होती. यावेळी सदर ठिकाणी खेळायला गेलेला १३ वर्षीय मुलगा कुणाल कनौजिया याचा पाय त्या उघड्यावर पडलेल्या विद्युत तारेमध्ये अडकून ती विद्युत तार त्याच्या हातात आली आणि इलेक्ट्रिक शॉकमुळे त्याच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर इजा झाली. यानंतर कुणाल कनौजिया याला तत्काळ जवळच्या एमपीसीटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
दुसरीकडे पैशाच्या अभावी एमपीसीटी रुग्णालयातील डॉक्टर या मुलाच्या बोटावर शस्त्रक्रिया करायला तयार नव्हते. सदर बाब समजताच ‘महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना'च्या शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी २६ मार्च रोजी जाब विचारताच रुग्णालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. यानंतर कुणाल यांच्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, दुर्दैवाने त्याला ३ बोटे गमवावी लागली आहेत. जर कुणाल कनौजिया याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया केली असती तर त्याची किमान २ बोटे वाचली असती, असे डॉ. आरती धुमाळ यांचे म्हणणे आहे.
सदरचा अपघात संबंधित कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्या चुकीमुळे घडलेला आहे. असे असून सुध्दा हॉस्पिटल मध्ये एवढे दिवस पैसे न भरल्यामुळे लहान मुलाला तीन बोटे गमवावी लागल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे डॉ. आरती धुमाळ यांनी महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेचा जाब विचारला. यानंतर शहर अभियंता देसाई यांच्या निर्देशानुसार उप अभियंता लोकरे यांनी स्थळ पाहणी केली.
दरम्यान, ‘मनसे'च्या महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ यांनी महापालिकेने अपघातग्रस्त मुलाला नुकसान भरपाई देण्यासह संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा ‘मनसे'तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याप्रसंगी डॉ. आरती धुमाळ यांच्यासमवेत ‘मनसेे'च्या महिला सेना उपशहरअध्यक्ष दिपाली ढऊळ, शहर सचिव यशोदा खेडस्कर, शाखा अध्यक्षा संगीता वंजारे, भक्ती खरात, अरुणा मोरे आणि महारष्ट्र सैनिक उपस्थित होते.