तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमुळे वायु प्रदुषण होत असल्याची तक्रार
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील दर्शन केमिकल या कंपनीमधुन घातक रासायनिक उत्सर्जन होत असल्याने या पट्टयात असलेल्या इतर कंपन्यामधील कर्मचा-यांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कंपनीतून बाहेर पडणा-या दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे या भागातील इतर कंपनीतील कर्मचायांना दुपारचे जेवण करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या पट्टयात काम करणा-या कामगार वर्गाकडुन करण्यात येत आहे.
तुर्भे एमआयडीसीतील दर्शन केमिकल्स या कंपनीमधुन सतत दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुके बाहेर पडत असल्यामुळे या परिसरातील संपूर्ण वातावरण प्रदूषित होत आहे. या दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार या भागातील इतर कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांकडुन करण्यात येत आहे. या केमिकल कंपनीतून जमिनीखाली रसायने सोडण्यात येत असल्यामुळे या केमिकल फॅक्टरीला लागुन असलेल्या शेजारील फ्लॉटमध्ये असलेली विविध प्रकारची फळझाडे व इतर झाडे मृत झाल्याची माहिती पुलराज इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेड या कंपनीतील कर्मचा-यांनी दिली.
या कंपनीतील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सर्व सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्यामुळे तसेच विषारी धुरामुळे या भागातील नागरिकांमध्ये विविध प्रकारचे आजार पसरत असल्याने सदर कंपनीच्या आसपासच्या परिसरात काम करणे अशक्य झाल्याच्या तक्रारी या भागात काम करणा-या कर्मचा-यांकडुन करण्यात येत आहेत. या कंपनीच्या आजुबाजुला ट्रायडेंट टेक्निकल सर्व्हीसेस, लेनॉक्स फ्लास्ट प्रा.लि., सरला फुड्स, प्रोव्हिल फार्मास्युटीकल कंपनी, ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. आदी कंपन्या असून त्यात पाचेशे पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्याशिवाय या भागात नव्यानेच तारांकित विवांता हॉटेल देखील सुरु झाले आहे. त्यामुळे या भागात बाहेरील नागरिकांचा देखील वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यांनतर देखील या कंपनीकडुन घातक रासायनिक उत्सर्जन थांबवण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.
या कंपनीत असलेली अग्निशमन यंत्रणा अपुरी व अकार्यक्षम असल्यामुळे या ठिकाणी आगीचा मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या कंपनीच्या आजुबाजुला असलेल्या सर्व कारखान्यांना देखील त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. या कंपनीने संपूर्ण भूखंडावर बांधकाम केल्याने येथे आग लागल्यास या कंपनीच्या परिसरात अग्निशमन दलाला प्रवेश करणे अडचणीचे ठरणार आहे. या कंपनीच्या आवारात केमिकलने भरलेले ड्रम उघडयावर ठेवण्यात येत असल्यामुळे देखील मोठा धोका होऊ शकतो. अशी भिती या कंपनी लगत असलेल्या इतर कंपनी चालकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
जेम्स डाबरे (ऍडमिनीस्ट्रेशन मॅनेजर-ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स लि.)
दर्शन केमिकल्स या कंपनीतून बाहेर पडणाऱया दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे आमच्या कंपनीतील कर्मचा-यांना दुपारचे जेवण करणेही अशक्य झाले आहे. या कंपनीमुळे होणा-या या त्रासाबाबत आम्ही मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करुन त्याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र संबधित कंपनीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कंपनीविरोधात आमच्या कंपनीतील सर्व कर्मचारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
जयंत कदम (उप प्रादेशीक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ)
तुर्भे एमआयडीसीतील दर्शन केमिकल्स या कंपनीबाबत यापुर्वी आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना कामकाजात सुधारणा करण्याबाबत सुचित करण्यात आले होते. सध्या या कंपनीबाबत मंडळाकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रार आल्यास त्यानुसार कंपनीवर कारवाई करण्यात येईल.