‘महाविकास आघाडी'चे जागा वाटप जाहीर
मुंबई ः अखेर ‘महाविकास आघाडी'च्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवकामोर्तब झाले आहे. ‘लोकसभा निवडणूक-२०२४'साठी अखेर ‘महाविकास आघाडी'चा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस पक्ष १७ जागांवर निवडणूक लढणार आहे. दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासूनचा ‘महाविकास आघाडी'चा सुरु असलेला जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचाही तिढा सुटला आहे.
मुंबईमध्ये शिवालय येथे ‘महाविकास आघाडी'ची ९ एप्रिल रोजी संयुवत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदला ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे सर्वसर्वा शरद पवार, ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे'चे प्रमुख उध्दव ठाकरे, ‘काँग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ‘राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत यांच्यासह ‘महाविकास आघाडी'मधील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषद मध्ये खा. संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडी'चा जागावाटप जाहीर केला.
त्यानुसार ‘महाविकास आघाडी'च्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस-१७ जागा, राष्ट्रवादी (काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्ष-१० जागा आणि शिवसेना (ठाकरे गट) २१ जागांवर निवडणूक लढणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली, भिवंडी, मुंबई मधील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल, याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार ‘सांगली'ची जागा ठाकरे गट लढवणार असून ‘भिवंडी'ची जागा ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'कडे देण्यात आली आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी २ जागा काँग्रेस लढवणार असून उर्वरित ४ जागा ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती खा. संजय राऊत यांनी दिली.
‘काँग्रेस'च्या जागाः
नंदूरबार, धुळे, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, जालना, मुंबई उत्तर मध्य, उत्तर मुंबई, रामटेक, अमरावती, नागपूर, नांदेड, चंद्रपूर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर.
‘राष्ट्रवादी'च्या जागाः
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.
‘शिवसेना-ठाकरे गट'च्या जागाः
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य, ठाणे, कल्याण, जळगांव, परभणी, नाशिक, पालघर, मावळ, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, संभाजीनगर, धाराशीव, हातकणंगले, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम.