शाळेत न जाणाऱ्या मुले-मुलींसाठी शाळाच त्यांच्या दारी

वाशी : पुणे शहरानंतर नवी मुंबई शहराला शिक्षणाची दुसरी पंढरी  संबोधली जाते. त्यामुळे नवी मुंबई शहरात खाजगी शाळांसह नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये देखील शिक्षणाची गंगा वाहत आहे. मात्र, नवी मुंबई मध्ये शिक्षणाची गंगा वाहत असून देखील झोपडपट्टी भागासह निराधार मुले-मुलींपर्यंत या गंगेचे पाणी पोहचत नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांसाठी ‘डोअर स्टेप' या सामाजिक संस्थेने ‘शाळा आपल्या दारी' उपक्रम सुरु करुन शाळाबाह्य मुले-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबई मध्ये जानेवारी महिन्यापासून ‘डोअर स्टेप'ची शाळा दारा-दारात शिक्षण देत आहे.

समाजातील वंचित, गरजू मुले-मुली आज विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘डोअर स्टेप' नावाची संस्था गेली अनेक वर्षे काम करत आहे. ‘डोअर स्टेप'ची स्थापना रजनी परांजपे यांनी १९९३ साली पुणे येथे केली. शहरातील वंचित मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शालाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबई शहरात ‘डोअर स्टेप'च्या शाळांना कोविड काळात सुरुवात झाली. आज मुंबई मध्ये ५, रायगड मध्ये १ आणि नवी मुंबई मध्ये १ अशा एकूण ७ शाळा ‘डोअर स्टेप' संस्था चालवते.

नवी मुंबई शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. वाढत्या नागरीकरणासोबत येथे रोजगाराच्या  शोधात येणाऱ्या गरजू लोकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे दोन वेळा जेवणाची भ्रांत असलेले लोक आज नवी मुंबई शहरातील विविध झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे मिळेल ती मोलमजुरी करुन किंवा भिक मागून लोक आपला उदरनिर्वाह चालवतात. या लोकांची मुले-मुली आज शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे या मुलांना शिक्षणाची गोडी लागून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ‘डोअर स्टेप'ने सुरु केला आहे. ‘डोअर स्टेप' तर्फे ‘फिरती शाळा' उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एका बस मध्ये ‘डोअर स्टेप'ची फिरती शाळा भरत असून, या शाळेत एका जागेवर दोन ते अडीच तास लहान मुले-मुलींना शिक्षण देण्यात येत आहे. नवी मुंबईतील चार झोपडपट्टी परिसरात ‘डोअर स्टेप'ची फिरती शाळा सध्या भरत असून, या शाळेत मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

नवी मुंबई महापालिका आज नवी मुंबई शहरातील गरजू मुलांना मोफत शिक्षण देते. मात्र, आजही नवी मुंबई शहरातील अनेक मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडे आज अनेक बसेस वापराविना पडून असून, व्होल्व्हो बसेस महापालिका प्रशासनाने विक्रीस काढल्या आहेत. मात्र, या बसेसचा उपयोग महापालिकेने  ‘शाळा आपल्या दारी' उपक्रम करिता करुन फिरत्या शाळा सुरु केल्या तर नवी मुंबईतील शाळा बाह्य मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

फिरती शाळा उपक्रम रस्त्यावर भटकणाऱ्या, भीक मागणाऱ्या, झोपडपट्टी भागातील शिक्षणापासून वंचित मुले-मुलींसाठी आहे. शिक्षणाची गोडी निर्माण  करुन त्यांना जवळच्या शाळेमध्ये समाविष्ट करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. - बिना शेठ लष्कारी, सह संस्थापिका, डोर स्टेप - पुणे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण, डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, अंबरनाथ मधील पाणी समस्येवर सकारात्मक बैठक