ठाणे येथे ‘गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन'ला सुरुवात

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या ठाणे शहरातील उत्तमोत्तम प्रकल्पातील नागरिकांच्या बजेटनुसार घरांचा समावेश असलेल्या ‘गृह उत्सव 'प्रॉपर्टी प्रदर्शन-२०२४' चे उद्‌घाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, ‘क्रेडाई एमसीएचआय-ठाणे'चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, माजी अध्यक्ष अजय आशर, ‘क्रेडाई एमसीएचआय-ठाणे प्रदर्शन समिती'चे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांच्यासह इतर पदाधिकारी-सदस्य आणि ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

रिअल इस्टेट क्षेत्राबरोबरच नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीकोनातून ठाणे शहर विकसित झाले आहे. ठाणे शहरातील नागरिकांना उत्तम राहणीमानाच्या दृष्टीने विविध सुविधा मिळत आहेत. यापुढील काळातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील नागरिकांना फायदा होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

ठाणे शहराला राहण्याचे शहर म्हणून नागरिकांची वेगाने पसंती मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरात विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणेसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून यामुळे मुबलक पाणीपुरवठा होणार आहे, असे आ. प्रताप सरनाईक म्हणाले.

या प्रदर्शनात नागरिकांच्या पसंतीच्या स्वस्त घरांपासून प्रशस्त घरांपर्यंत आणि शहराच्या मध्यवर्ती वस्तीपासून निसर्गरम्य परिसरातील घरांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार, यंदाच्या ‘प्रदर्शन'ला सुमारे २० हजारांहुन अधिक नागरिक घरखरेदीसाठी भेट देतील, अशी अपेक्षा ‘क्रेडाई एमसीएचआय-ठाणे'चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.

ठाणे शहर समृध्द सांस्कृतिक शहर असून, निसर्गसौदर्याबरोबरच सुरक्षित वातावरणासाठी प्रसिध्द आहे. या शहरातील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध असून, शहराचा परिपूर्ण विकास झाला आहे. या शहराची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख होत आहे, याकडे जितेंद्र मेहता यांनी लक्ष वेधले. ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'च्या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांसाठी उत्तम प्रकल्प मिळतील. या प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स कडून सुरक्षित आणि उत्कृष्ट सुविधा असलेले प्रकल्प सादर करण्यात आले आहेत, असे मेहता यांनी सांगितले.

ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर ‘गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन'ला १६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. येत्या १९ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ११ पासून रात्री ८ पर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे. या ‘प्रदर्शन'च्या माध्यमातून ठाणे येथे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न साकार होईल, असे ‘क्रेडाई एमसीएचआय-ठाणे प्रदर्शन समिती'चे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. सदर २१ व्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या पसंतीच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, असे माहेश्वरी म्हणाले.

गेल्या काही वर्षांपासून क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांनी नियोजनबध्द पध्दतीने ठाणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास केला. त्याची प्रचिती नागरिकांना प्रदर्शन मधील उत्तमोत्तम प्रकल्प पाहताना येईल. घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांसाठी प्रदर्शन उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे, असे ‘क्रेडाई एमसीएचआय-ठाणे'चे माजी अध्यक्ष अजय आशर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत घर खरेदीचा ट्रेंड बदलत आहे. नव्या पिढीच्या गरजांनुसार घरांना मागणी वाढत आहे. त्यानुसार ठाणे रिअल इस्टेट क्षेत्रात क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांच्या सदस्यांनी विविध प्रकल्प साकारले आहेत. ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये आधुनिक पध्दतीची घरे सादर करण्यात आली आहेत. या घरांच्या खरेदीसाठी प्रत्येक इच्छुक खरेदीदाराने ‘प्रदर्शन'ला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पुजेचा अधिकार द्या