मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
पनवेल शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबवून एका बांग्लादेशी नागरिकांसह अंमली पदार्थ बाळगणारे तसेच दारु आणि अंमली पदार्थाचे सेवन करणारे अशा एकूण १२ जणांची पोलिसांनी धरपडक केली. त्याशिवाय पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर, संशयित व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाई मुळे पनवेल परिसरात वावरणाऱ्या गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीसीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. २२ एप्रिल रोजी रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यात आले होते. या पोलीस बळाची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून पनवेल हद्दीत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकाला तसेच अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घ्ोतले. त्याचप्रमाणे दारुबंदी अंतर्गत ३ जणांवर कारवाई करुन तसेच दारु आणि अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या अशा एकूण १२ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान पोलीस ठाणे हद्दीत ३ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकांबदी दरम्यान, पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ८४ व्यक्तींविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच २ वाहनांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह नुसार कारवाई करण्यात आली. या कोबिंग ऑपरेशनवेळी २ पाहिजे असलेले आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
तसेच बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट असलेले १८ आरोपी देखील मिळून आले. त्याचप्रमाणे ३३ संबंधितांना समन्सची बजावणी करण्यात आली. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या ५१ व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अभिलेखावरील पाहिजे, फरारी आणि हिस्ट्रीशिटर, गुंड अशा एकूण २४ आरोपींची तपासणी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी -कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.