मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
आवक कमी; बटाटा दरात वाढ
तुर्भे : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केट मध्ये महाराष्ट्र राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या बटाट्याची आवक कमी झाल्याने एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात बटाटा दरात वाढ झाली आहे.
वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात आता कांद्याचे दर स्थिर झाले असून, बटाटा दरात वाढ सुरु झाली आहे. घाऊक बाजारात बटाट्याचे दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो झाले असून, किरकोळ बाजारात बटाटा दर ३० रुपये प्रतिकिलो पर्यंत झाला आहे. नेहमी घाऊक बाजारात बटाटा दर १० ते १५ रुपये प्रतिकिलो पर्यंत असतो. मात्र, बटाटा दरवाढ तात्पुरती असणार आहे, असे एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी लसूण दरात वाढ झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बटाटा ऐवजी लसूण लागवड केली. परिणामी बटाटा उत्पादन कमी झाले. त्यामुळे आता एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात बटाटा कमी प्रमाणात येत आहे. याशिवाय उत्पादन होत असणाऱ्या स्थानिक बाजारात बटाट्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारातच बटाटा पाठवत असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात बटाटा येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश मधून बटाट्याची आवक होत असते. नेहमी बाजारात दररोज ७० ते ८० गाड्या बटाटा येत असतो. बाजाराची दररोजची मागणी पूर्ण करण्यासाठी ७० ते ८० गाड्या बटाटा बाजारात यायला लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात दररोज ५० गाड्या बटाटा येत आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी पूर्ण करण्यासाठी बटाटा आवक पुरेशी होत नाही. परिणामी बटाट्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे.