ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कामगार मंत्र्यांची दुर्घटनाग्रस्त अमुदान कंपनीत पाहणी
डोंबिवली : २३ मे रोजी डोंबिवली मधील अमुदान कंपनीत रासायनिक स्फोट झाल्यानंतर २७ मे रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच स्फोटासंदर्भात आढावा बैठकही घेतली. याप्रसंगी ना. सुरेश खाडे यांच्यासोबत प्रधान सचिव (कामगार), कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कंपनीच्या कारभाराची माहिती घेतली. दरम्यान, शासन कामगारांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन कामगार मंत्री खाडे यांनी यावेळी दिले.
ना. सुरेश खाडे यानी स्फोट झाला, त्या औद्योगिक विभागातील फेज-२ मधील अमुदान कंपनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. स्फोटातील पिडीतांना शासन सर्वतोपरी मदत करेल. तसेच दोषींवर कारवाई होईल. दरम्यान काम करीत असताना कंपनी नियमांचे उल्लंघन करुन कोणी जर नियमाचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर सुध्दा कारवाई केली जाईल, असे ना. सुरेश खाडे यांनी सांगितले.
सत्य काय ते समोर येईलच. कामगारांच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी शासन कमी पडणार नाही. कुशल-अकुशल कामगार बाबतीचे धोरण पाहिले जाईल. आमच्या माहितीनुसार संबंधित कंपनीचे सेपटी ऑडिट झाले होते. तसा प्रत्येक वर्षांचा अहवाल तपासला जाईल. कंपनी मालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली असून त्याला अटकही करण्यात आली आहे. कामगारांचे नुकसान होणार नाही, याची शासनाने सर्वतोपरी जबाबदारी घेतली असल्याचेही ना. खाडे यावेळी म्हणाले.
ना. सुरेश खाडे यांनी डोंबिवली मधील खाजगी एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन घटनेतील उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची विचारपूस करुन त्यांना आधार दिला. मात्र, ना. खाडे ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'च्या कार्यालयास भेट देणे टाळून थेट मुंबईकडे प्रयाण केले.