ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘महाविकास आघाडी'तर्फे वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ‘इंडिया-महाविकास आघाडी'च्या वैशाली दरेकर- राणे यांनी ३० एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ‘महाविकास आघाडी'तर्फे डोंबिवली मधील इंदिरा गांधी चौक ते वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलपर्यंत रॅली काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या रॅलीला सुरुवात झाली. इंदिरा गांधी चौकातून निघालेली सदर रॅली चार रस्ता, लोकमान्य टिळक पुतळा, शेलार नाका येथून घारडा सर्कल येथे दाखल झाली. यावेळी ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे'चे नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, माजी आमदार सुभाष भोईर यांची प्रमूख उपस्थिती होती.
दरम्यान, ‘कल्याण'मध्ये आम्ही एक सर्वसाधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे. महाविकास आघाडी जनतेच्या हिताचे बोलत आली आहे, महाराष्ट्र हिताचे बोलत राहू. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? महाराष्ट्राचा विकास २ वर्षे रखडलेला असल्याची टिका करत सदर विषयावर मुख्यमंत्र्यांनी एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन आपल्याशी डिबेट करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. तर जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते, तेव्हा हिंदू-मुस्लिम असे विषय घेऊन आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत, महाराष्ट्र हिताचे आज जर आम्ही बोललो नाही तर महाराष्ट्राचे मंत्रालय सुध्दा गुजरातला नेले जाईल, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.