यंदा गृहिणींना घरगुती मसाला बनविण्याकरिता दिलासा

वाशी : मार्च महिन्यात होळी सण संपताच महिलांची घरगुती मसाला बनविण्यासाठी लागणारी लाल मिरची, मसाल्यासाठी लागणारे मसाला पदार्थ घेण्यास लगबग सुरु होत असते. यंदा देखील घरगुती मसाले बनवण्यास सुरुवात झाली असून, महिलांची पाऊले बाजाराकडे वळू लागली आहेत. यावर्षी देखील मसाला बनविण्यासाठी गृहिणींना दिलासा मिळाला आहे.मागील दोन वर्षांपूर्वी लाल मिरची दर वाढले होते. यंदा मात्र घाऊक बाजारात मागील वर्षी प्रमाणे लाल मिरची दर स्थिर आहेत.

होळी सण संपताच चैत्र, वैशाख महिना सुरु होतो. या महिन्यात गाव जत्रा आणि लग्नसराई सुरु होते. त्यामुळे या दिवसात घरगुती  मसाला बनवला जात असल्याने बाजारात ‘लाल मिरची'ची मागणी वाढते. ‘लाल मिरची'ची वाढती मागणी पाहता वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला बाजारात मार्च महिन्यापासूनच कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लाल मिरची दाखल होण्यास सुरुवात होते. तसेच लाल मिरची मधील पांडी, लवंगी, बेडगी, काश्मिरी, शंकेश्वरी मिरची यांची आवक होते. यामध्ये महिला लवंगी, काश्मिरी, बेगडी, शंकेश्वरी मिरचीला अधिक पसंती देतात. महिला वर्षभराचा मसाला एकदाच करुन ठेवत असल्याने प्रत्येक जण कमीत कमी ४ किलो ते जास्तीत जास्त ८ किलो पर्यंत घरगुती मसाला बनवून ठेवतात. काही महिला मिरची स्वस्त दरात मिळावी याकरीता समुहाने लाल मिरची खरेदी करतात.यावर्षी घाऊक  बाजारात लवंगी मिरची ३२०, बेडगी, पांडी ३२०, लाल मिरची १२० आणि काश्मिरी मिरची ६८०, संकेर्श्वेरी मिरची ९२० रुपये प्रतिकिलो दर आहे. तर या व्यतिरिक्त इतर मसाले घेऊन लाल मसाला बनवला जातो.

बाजारात दोन प्रकारची मिरची
घरगुती मसाला बनवण्यासाठी दोन प्रकारची मिरची बाजारात दाखल होते. एक कर्नाटकी आणि दुसरी गुजराती.यात कर्नाटकी मिरचीचा दर्जा  चांगला असल्याने या मिरचीचे दर अधिक असतात. मात्र, या मिरचीचा मसाला अधिक चांगला बनतो.

बाजारात घरगुती मसाला बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु   झाली आहे. मसाला बसवण्यासाठी लाल मिरची जरी मुख्य घटक असला तरी त्याची गुणवत्ता इतर गरम मसाल्यांवर अवलंबून असते. त्यामुळे घरगुती मसाले जितके चांगले आणि प्रमाणात घ्याल तितका मसाला चवदार बनतो. यंदा देखील मिरची दर स्थिर असल्याने गृहिणींना थोडाफार दिलासा मिळणार आहे. - आदित्य गायकवाड, जय महाराष्ट्र मसाला दुकान - एपीएमसी मार्केट, वाशी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळापूर्व कामांसाठी ३० मे पर्यंत डेडलाईन