भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

तुर्भे : प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर वाशी वाहतुक नियंत्रण शाखा द्वारे कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे.

नवी मुंबई पोलीस उपआयुक्त (वाहतुक) तिरुपती काकडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांच्या पथकाने प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली.

एका प्रवाशाने वाशी सेक्टर-१७ येथून इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचालकाला विचारले असता त्याने  भाडे नाकारून वाद घातला. या प्रकरणी सदर प्रवाशाने नवी मुंबई पोलिसांच्या टि्‌वटरवर (एक्स) तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घ्ोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी त्वरित वाहतूक पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, देशमुख, भोसले, जाधव, पाटील यांचे खाजगी गणवेशात विशेष पथक तयार केले. तसेच या पथकातील कर्मचारी वाशी वाहतुक नियंत्रण शाखेच्या हद्दीत विविध ठिकाणी नियुक्त केले. या मोहिमेत भाडे नाकारणारे ८ रिक्षाचालक आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षा चालकांनी प्रवाशांशी उध्दटपणे न वागता सौजन्याने वागावे, भाडे नाकारु नये, तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, याविषयी या मोहीम ेदरम्यान रिक्षा चालकांचे प्रबोधनही करण्यात आले. दरम्यान, संबंधित रिक्षाचालकांवर प्रवासी भाडे नाकारण्याचा गुन्हा पहिल्यांदा केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारण्याचा गुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणीबिल वसुलीसाठी महापालिका तर्फे धडक कारवाई