मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
कोपरखैरणे पोलिसांचे कोबींग ऑपरेशन
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीचे उच्चाटन करण्यासाठी नवी मुंबई पोलिसानी कोंबींग ऑपरेशन राबवून विविध गुन्ह्यातील ६ आरोपींची धरपकड केली. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३० पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. सदर कारवाईदरम्यान एका आरोपी सोबत झालेल्या झटापटीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील जखमी झाले.
कोपरखैरणे परिसरात गुंड टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत वाढ होत असल्याचे आढळून आल्याने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर, संशयित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानुसार परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली २ मार्च रोजी रात्री कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
या कोबींग ऑपरेशन दरम्यान पोलिसांच्या हाती १७ घरफोडी गुन्ह्यांतील हवा असलेला आरोपी सलीम इमाम उद्दीन खान (२८) लागला. तसेच कोपरखैरणे मध्ये शरीराविरुध्दच्या दाखल गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी रिझवान सादीक कुरेशी (३२) देखील पोलिसांच्या हाती लागला. त्याचप्रमाणे खैरणे गावात बेकायदेशीररित्या राहणारी पॉपी इमरुल मुल्ला (२०) या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यावेळी तिचा दिर लाहु मुना पोलिसांना बघून पळून गेला.
यावेळी बोनकोडे गांव येथे पोलिसांच्या हाती हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अज्जु जॉन फ्रान्सीस (२७) लागला. यावेळी अज्जुने जामिनावर सुटल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे जामिनाच्या आदेशाची मागणी केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच त्याने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या जाती जबरी चोरीच्या गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी साहिल रफिक अन्सारी (२२) याची देखील पोलिसांनी घणसोली गावातून धरपकड केली. यावेळी त्याच्याकडे ४ मोबाईल फोन सापडले.
दुसरीकडे कॉबींग आपरेशन दरम्यान रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक पिटर मोबाईलने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना सेक्टर-५ मधील पारसिक बँक समोरील रोडवर नितीन संपत खरात (२४) नामक बाईकस्वार संशयितरित्या उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि इतर २ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कोयता जप्त केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या झटापटीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नितीन खरात याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच भारतीय हत्यार कलम कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर कोंबींग ऑपरेशन वेळी एकूण २७ समन्स आणि २ बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. तसेच ३ नॉन बेलेबल वॉरंट मधील व्यक्तींचा शोध घ्ोतला असता त्यातील दोघेजण सध्या जेल मध्ये सजा भोगत असून १ व्यक्ती कर्नाटक राज्यात असल्याचे आढळून आले आहे.