ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
नवी मुंबई : येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पनवेल शहर पोलिसांच्या वतीने शिस्तबध्दरितीने रूट मार्च काढण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकराची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा या रुट मार्चदरम्यान पोलिसांनी दिला.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-2 कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारामध्ये विश्वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी पनवेल शहर पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस निरीक्षक 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व 30 अंमलदार तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालायत दाखल झालेल्या 3 एसआरपीएफ कंपनीचे 3 अधिकारी, 65 अंमलदार सहभागी झाले होते.
या रुट मार्च दरम्यान पोलिसांनी पनवेल मधील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती आदी ठिकाणी भेट दिली. पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सुरु झालेला हा रुट मार्च बावन्न बंगला-सुफा मस्जीत-मुसलमान नाका मोहल्ला-पटेल मोहल्ला -कोळीवाडा-उरण नाका, पंचरत्न चौक - तक्का गाव-रेल्वे स्टेशन-शिवाजीनगर-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा-एसटी डेपो येथे समाफ्त करण्यात आला. आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकराची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा या रुट मार्चदरम्यान देण्यात आला.