अटल सेतू, उरण रेल्वे मुळे ‘दक्षिण नवी मुंबई'च्या विकासाला चालना

नवी मुंबई : मुंबईला थेट दक्षिण नवी मुंबईचे टोक असलेल्या उरण शहराशीजोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर १२ जानेवारी पासून लोकल सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे सध्यानेरुळ ते खारकोपर पर्यंत धावणारी उपनगरी लोकल आता थेट उरण पर्यंत धावत असल्याने सिडको अंतर्गत ‘दक्षिण नवी मुंबई'च्या विकासाच्या इंजिनाने वेग पकडला आहे.

तर दुसरीकडे ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक' अर्थात अटल सेतू असा अति भव्यदिव्य सागरी मार्ग देखील दळणवळणासाठी खुला झाला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि ‘दक्षिण नवी मुंबई'मध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. परिणामी, ‘दक्षिण नवी मुंबई'मधील उरण-द्रोणागिरी परिसरासह नव्याने निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या परिसरात गुंतवणुकीचे सर्वात मोठे केंद्र निर्माण होणार आहे. ‘अटल सेतू'मुळे आणि जेएनपीटी परिसरात निर्माण झालेल्या सर्व्हिस इंडस्ट्री आणि ‘लॉजिस्टिक
हब'मुळे प्रॉपर्टीसाठी दक्षिण नवी मुंबई सर्वात हॉट डेस्टीनेशन ठरणार आहे.

न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक आणि उरण रेल्वे प्रकल्पामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांचा वाढता लोंढा मुंबई उपनगरात किंवा वसई-विरारला न जाता तो आता ‘दक्षिण नवी मुंबई'मधील द्रोणागिरीकडे वळल्यास आश्चर्य वाटू नये. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि नैना प्रकल्पासह जेएनपीटी पोर्टचा चौपटीने विकास होत असल्यामुळे ‘सिडको'च्या द्रोणागिरी नोडला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भविष्यात ‘सिडको'तर्फे ‘दक्षिण नवी मुंबई'मध्ये देखील परवडणाऱ्या घराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 याशिवाय उरण परिसरात असलेल्या जेएनपीटी बंदरामुळे या ठिकाणी सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच कार्गो गोडाऊन्स मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. ओएनजीसीसह अन्य मोठया कंपन्या या परिसरात कार्यरत आहेत. द्रोणागिरी येथूनच चिरनेर मार्गे मुंबई-गोवा हायवेला कनेविटव्हिटी दिली गेली आहे. त्यामुळे साऊथ मुंबईहून पुण्यासह कोकणात किंवा गोव्याला जाण्यासाठी व्हाया एमटीएचएल मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. ‘न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक'मुळे दक्षिण नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई काही मिनिटांच्या अंतरावर आल्या आहेत.

एकंदरीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-जेएनपीटी फ्रेट कॉरिडॉर, विरार-वसई-अलिबाग कॉरिडॉर, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, मुंबई-पुणे-नाशिक आदि रिंगरुट कनेक्टिव्हिटी प्रकल्प ‘दक्षिण नवी मुंबई'सह ‘तिसरी मुंबई'च्या विकासाला चालना देणारे ठरत आहेत.

नवी मुंबईसारखे सुनियोजित शहर, दळण-वळणाच्या सोयी-सुविधा, मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प तसेच नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पामुळे ‘दक्षिण नवी मुंबई'मध्ये ‘सिडको'च्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. ‘सिडको'ने उभारलेल्या नवी मुंबई क्षेत्रात सर्वात जास्त ६२ सेक्टर्स द्रोणागिरी नोडमध्ये विकसित केले जाणार आहेत. -अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त डॉ. मृण्मयी भजक यांनी गुंफले तिसरे पुष्प