मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
वाशीमध्ये धारधार शस्राने हल्ला करुन तरुणाची निर्घृण हत्या
नवी मुंबई : वाशीतील जुहूगाव येथे बसची वाट पाहत बसलेल्या एका तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्राने हल्ला करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर देखील सदर हल्लेखोरांनी शस्राने प्राणघातक हल्ला करुन मोटारसायकलवरुन पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोराविरोधात हत्या तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव मुकेश उर्फ मंटु कुमार यादव (26) असे असून तो कोपरखैरणे येथे राहत होता. तसेच तो वाशी जुहूगाव येथील कपिल किनारा या बारमध्ये काम करत होता. गुरुवारी पहाटे बार मधील काम संपवून मंटु कुमार यादव हा कोपरखैरणे येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यासाठी तो पावणे पाच वाजण्याच्या सुमारास फिजिक्स जिमच्या बिल्डिंग मधील तळमजल्यावरील ओम सिद्धिविनायक होमीयोपेथी दुकानाच्या कट्टयावर बसची वाट पाहत बसला होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मंटु कुमार यादव याच्या हातामधील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुकेशने त्याला विरोध केल्याने सदर हल्लेखोराने मंटु कुमार यादव सोबत झटापट केली. याच वेळी दुसऱ्या हल्लेखोराने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्राने मंटु कुमार यादव याच्या छातीवर तसेच कपाळावर व हातावर वार केले. यावेळी मंटु कुमार यादव याची आरडा ओरड ऐकून जुहू गावात राहणारा दिनेश जगदीश यादव (41) हा हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेला असता, सदर हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील शस्त्राने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघेही हल्लेखोर मोटारसायकलवरून पळुन गेले.
या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मंटु कुमार आणि दिनेश या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र मंटु कुमारचा रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झाला. या हत्येच्या घटनेनंतर वाशी पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्या, तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.