मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
न्हावाशेवा परिसरातील गावठी दारुचे २ अड्डे उध्वस्त
नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने न्हावाशेवा भागातील शेलघर गावातील स्मशानभूमी लगत हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या दोन अड्डयावर छापे मारुन दोन्ही अड्डे उध्वस्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीची दारु गाळणाऱ्या एकाला अटक करुन दिड लाख रुपये किंमतीची २८०० लिटर हातभट्टीची दारु नष्ट केली आहे. यावेळी पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलघर गांव, स्माशानभूमीच्या पाठीमागे इरा आणि इराळा तळाच्या बाजुला असलेल्या पडीक जागेवर काही व्यक्ती अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारु तयार करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने २३ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शेलघर गांव स्माशानभूमीच्या पाठीमागे इरा येथे आणि इराळा तळालगत छापा मारला. यावेळी त्याठिकाणी दिलीप पाडुरंग भगत (६५) अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु तयार करताना आढळून आला.
त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याठिकाणी सापडलेले १ हजार लिटर कच्या दारुने भरलेले ७ पिंप, ३० लिटर गाळून तयार केलेली गावठी दारु तसेच दारु निर्मितीसाठी आवश्यक असणारे साहित्य जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी सापडलेले १हजार लिटर कच्ची दारु जागेवरच उध्वस्त केली आहे. त्यानंतर अनैतिक मनावी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने काही अंतरावर सुरु असलेल्या दुसऱ्या हातभट्टी दारु तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा मारला. मात्र, यावेळी पोलिसांची चाहुल लागल्याने तेथे अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारु तयार करणारे अक्षय वाघेआणि बाब्या वाघे पळून गेले.
त्याठिकाणीही पोलिसांच्या हाती कच्या दारुने भरलेल्या ९ पिंपामध्ये अंदाजे १८०० लिटर गावठी दारु त्यामध्ये ७ लिटर गाळुन तयार केलेली गावठी दारु तसेच दारु निर्मितीसाठी आवश्यक असणारे साहित्य लागले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने १८०० लिटर कच्ची दारु जागेवरच उध्वस्त केली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गावठी हातभट्टीची दारु गाळणाऱया दिलीप भगत, अक्षय वाघेआणि बाब्या वाघे या तिघांविरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा दाखल करुन दिलीप भगत याला अटक केली आहे. तसेच इतर दोघांचा शोध सुरु केला आहे.