ठाणे महापालिकेच्या ३६ विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो'च्या रॉकेट प्रक्षेपण केंद्राला भेट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या इयत्ता आठवी-नववी मधील ३६ विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी रोजी ‘इस्त्रो'च्या केरळ येथील तिरुवनंतपुरम्‌ मधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली. सदर ठिकाणी या विद्यार्थ्यांना आरएच-२०० या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विज्ञानमंच या संयुक्त प्रकल्पात सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

‘मराठी विज्ञान परिषद'च्या ठाणे शाखेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र प्रक्षेपण, त्याची आवश्यकता, उपयोग यांची विस्तृत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिले. सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी या अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण होते. त्यासाठी देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक उपस्थित होते. या प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी ‘इस्त्रो'च्या संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयात रॉकेटमध्ये ‘इस्त्रो'ने कशी प्रगती केली, प्रथम सायकलचा नंतर बैलगाडी यांचा रॉकेट वाहतुकीसाठी कसा उपयोग केला, ते विद्यार्थ्यांना पाहता आले. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा, चांद्रयान-१, मंगळयान, चांद्रयान-२, एकाच रॉकेट द्वारे १०४ उपग्रह, चांद्रयान-३, आदित्ययान यांची मॉडेल्स दाखवून माहिती देण्यात आली. गगनयान मोहिमेचीही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रक्षेपण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब' आणि ‘सारे जहासे अच्छा' या समुहगीतांनी एकच जल्लोश केला. दिवसभराच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

ठाणे महापालिका शाळांतील आठवी- नववी इयत्तेतील २२ मुले आणि १४ मुली असे ३६ विद्यार्थी तसेच ८ शिक्षक सदर पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सदर विद्यार्थी ठाणे येथे परतणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या आठवी आणि नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची गोडी लागावी, त्याविषयी कुतुहल असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी, तसेच तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुढाकार घेऊन ‘मराठी विज्ञान परिषद'च्या सहकार्याने ‘विज्ञानमंच' उपक्रम सुरु केला आहे. महापालिका शाळांतील इयत्ता आठवी आणि नववी मधील प्रत्येकी ४ ते ५ विद्यार्थ्यांचा विज्ञानमंच स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी गतवर्षी स्वातंत्र्यदिनी केले होते.

विज्ञानमंच या उपक्रमात खगोल अभ्यासवर्ग उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यातून एकूण ७७ विद्यार्थी यंदाच्या वर्षी सदर पाहणी दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहेत. त्यातील ४१ विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यालगत नारायणगाव येखील जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप केंद्राला भेट दिली होती. तर उर्वरित ३६ विद्यार्थ्यांनी ‘इस्त्रो'च्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली. 

 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शाळेत शिक्षक येताहेत लेट