घणसोली ते ऐरोली मार्ग प्रशस्त

नवी मुंबई : आधी सिडको आणि आता नवी मुंबई महापालिका करीत असलेल्या घणसोली ते ऐरोली दरम्यान पामबीच मार्गावरील १.१ कि.मी. लांबीचा ब्रीज आणि ७०० मीटरचा इंटरचेंज रस्ता कामाला उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम मार्गी लागले असून लवकरच भूमीपुजनानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

‘सिडको'ने सन २००९ मध्ये पामबीच मार्गावर घणसोली पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लावले. यानंतर ऐरोली येथे जोडण्यासाठी पुढे कांदळवन असल्याने ‘सिडको'ने सदर रस्ता अपूर्णच ठेवून पुढे तो नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केला. नवी मुंबई महापालिकेने सदर मार्गावर १.९५ किलोमीटरचा केबल ब्रिज पुल उभारण्यासाठी ८०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला होता. सदर बाब खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ‘सिडको'चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची भेट घेऊन अपूर्ण अवस्थेत ठेवलेला या पुलासाठी ‘सिडको'ने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. तसेच या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी‘सिडको'कडून मंजूर करुन घ्ोतला.
नवी मुंबई महापालिकेने या मार्गावर १.१ किलोमीटर लांबीचा ब्रीज आणि ७०० मीटरचा इंटरचेंज करुन ऐरोली-काटई मार्गाला जोडण्याच्या प्रकल्पाला ४९३ कोटींची मंजुरी मिळवली. यानंतर या प्रकल्पासाठी सीआरझेड, एमसीझेडएमए, आदि संबंधित संस्थांकडून विविध पर्यावरण विषयक परवानग्या तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे अनेक बैठका घेऊन परवानग्या मिळवल्या. यातील शेवटची उच्च न्यायालयाची परवानगी प्रलंबित होती, ती देखील १४ मार्च २०२४ रोजी मिळाल्याची माहिती खा. राजन विचारे यांनी दिली आहे.

आता या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून भूमीपुजनानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, असे खासदार विचारे यांनी सांगितले.

घणसोली-ऐरोली मार्गामुळे जड-अवजड वाहनांमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नवी मुंबईकरांची सुटका होणार असून  असून सदर मार्ग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सदर प्रकल्पाचे काम ३ वर्षात पूर्ण होणार आहे. - राजन विचारे, खासदार - ठाणे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 थकीत कर भरुन जप्ती कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन