स्लॅबचे प्लास्टर कोसळलेल्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा वापर थांबविण्याच्या सूचना

नेरुळ, सेक्टर 24 येथील स्वागत सोसायटीत या  घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले 

नवी मुंबई : पावसाळा कालावधीपूर्वीच नवी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केलेली असून त्यामध्ये सी-1 कॅटेगरीतील अतिधोकादायक इमारती खाली करण्याच्या नोटीसा बजाविलेल्या आहेत. त्या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या नेरुळ, सेक्टर 24 येथील स्वागत को.ऑप.हौ. सोसायटी या सिडकोकालीन ए-3 इमारतीतील तळमजल्यावरील ब्लॉक क्र.5 मध्ये स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. सदर घटना घडली तेव्हा स्लॅबखाली कोणीही व्यक्ती नसल्याने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

दरम्यान,  स्लॅबचे प्लास्टर कोसळलेल्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा वापर थांबविण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

 महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासह शहर अभियंता संजय देसाई व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी घटनास्थळाला तातडीने भेट देत परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांनी धोका लक्षात घेऊन त्वरित स्थलांतरित व्हावे, असे निर्देश दिले.

 स्थलांतराची नोटीस प्राप्त होऊनही व पाणी पुरवठा खंडीत करूनही पावसाळी कालावधी असल्यामुळे नागरिकांनी स्थलांतरण केले नव्हते. तथापी सदर घटना लक्षात घेऊन त्वरित पर्यायी व्यवस्था करावी व स्थलांतरण करावे असे निर्देश रहिवाशांना देण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द केली असून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घरांचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासाची पर्यायी व्यवस्था करावी असे महापालिकेमार्फत सूचित करण्यात आलेले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब दीड लाखावरून पाच लाख रूपये