‘कल्याण-तळोजा मेट्रो'च्या कामाला आठवड्याभरात सुरुवात

कल्याण : कल्याण-तळोजा १२ या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी या मेट्रो प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सदर गेमचेंजर कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असून या प्रकल्पासाठी तब्बल ५,८६५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील लाखो नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासोबतच लोकांच्या वेळेची आणि इंधनाचीही मोठी बचत होण्यास मदत होईल. कल्याण-तळोजा मेट्रो-१२ साठी कल्याण-शीळ मार्गावरील नवीन पलावा शेजारी असलेल्या भागात या प्रकल्पाचे पहिले पाईल ड्रील यशस्वीपणे करण्यात आले. तर पुढील कामाला आता लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या मेट्रो प्रकल्पामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान १९ उन्नत स्थानके असणार असून या स्थानकांच्या बांधकामासाठी ‘एमएमआरडीए'कडून १,५२१ कोटींची निविदाही जाहीर करण्यात आली आहे. त्यात या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे भूमीपुजन झाल्यानंतर त्याच्या कामाला आणखीनच गती प्राप्त होणार आहे. आगामी ३० महिन्यात ‘कल्याण-तळोजा मेट्रो'चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर मेट्रो लाखो लोकांच्या सेवेत दाखल होईल.

दरम्यान, भूमीपुजनानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करण्यासह खा. श्रीकांत शिंदे यांचे आभारही मानले आहेत, अशी माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मिशन कन्विक्शन अंतर्गत नवी मुंबई पोलिसांचे पथदर्शी उपक्रम