आवक कमी ; लिंबू महाग

तुर्भे : मागील १५ दिवसांपासून उष्णता वाढली असल्याने शीतपेये घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लिंबूपाणी यांसह अन्य थंड पेयाची मागणी वाढली आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील भाजीपाला बाजारात लिंबाची आवकही मंदावली आहे. सध्या लिंबाच्या ७ ते ८  गाड्या एपीएमसी फळ बाजारात दररोज येत आहेत. नेहमी एपीएमसी भाजीपाला बाजारात लिंबाची आवक १५ ते १६ गाड्या असते. परिणामी लिंबाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लिंबू २५० ते ४५० रुपये शेकडा झाले आहेत. तर किरकोळ बाजारात लिंबू पाच रुपये एक या दराने मिळत आहे. काही ठिकाणी मोठा लिंबू २० रुपयांना तीन या दराने विकला जात आहे.

मुंबई कृषि उत्त्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील घाऊक भाजीपाला बाजारपेठेत आंध्र प्रदेश, नगर मधून मोठ्या प्रमाणात लिंबू येत असतात. उकाडा वाढत असल्याने सध्या लिंबू पाण्याला मागणी वाढली आहे. शिवाय उसाच्या रसात देखील लिंबाचा वापर असतो. वेगवेगळे फ्रुट सॅलड तयार करतानाही लिंबूचा वापर केला जातो. त्यामुळे लिंबूची मागणी बाजारात वाढली आहे. घाऊक बाजारात मागील महिन्यात ५०ते ८० रुपये शेकडा या दराने विकले जाणारे लिंबू आत्ता २५०  ते ४५० रुपये शेकडा झाले आहेत. घाऊक बाजारातच लिंबाचे दर वाढले असल्याने, किरकोळ बाजारात देखील लिंबाच्या किमतीत वाढ झाली असून किरकोळ बाजारात पाच रुपयांना एक लिंबू ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात लिंबू दर आणखी वाढण्याची शक्यता एपीएमसी भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे एमआयडीसी मध्ये आग ; २ कामगारांचा मृत्यू