लेटलतिफ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई?
‘आप'कडून कोकण भवनमधील कार्यालयांमध्ये स्टींग ऑपरेशन
नवी मुंबई : राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या कार्यालयांची वेळ सकाळी ९.४५ ते सांयकाळी ६.१५ अशी असताना मिनी मत्रांलय म्हणून ओळख असलेल्या सीबीडी-बेलापूर मधील कोकण भवन येथील बहुतेक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेचे पालन करत नसल्याचे ‘आम आदमी पार्टी'च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पडताळणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी'च्या नवी मुंबई शाखेने कोकण भवन मधील बायोमेट्रिक मशिन्सचा योग्य विनियोग करुन सर्व कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत येतील आणि वेळ समाप्ती नंतरच जातील याची दक्षता घेण्याची सूचना कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
राज्य सरकारने आपल्या अखत्यारित असलेल्या सर्व कार्यालयांमधील कर्मचारी-अधिकारी वेळेत कार्यालयात हजर असावेत यासाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. असे असले तरी मिनी मत्रांलय म्हणून ओळख असलेल्या कोकण भवन मधील बहुतेक सर्व कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी त्याचे पालन करत नसल्याची माहिती ‘आम आदमी पार्टी'च्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे ‘आप'च्या काही प्रतिनिधींनी २८ डिसेंबर रोजी याबाबत सत्यता पडताळणी करण्यासाठी कोकण भवन मधील विविध कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी अनेक कार्यालयातील कर्मचारी सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत कार्यालयात येताना त्यांना दिसून आले.
यापैकी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील सर्व खुर्च्या ११.२० पर्यंत रिकाम्या असल्याचे तसेच महिला- बालविकास कार्यालयात अनेक महिला आपले रोजंदारीवरील कामे सोडून सकाळी १० वाजल्यापासून येऊन बसल्या होत्या. मात्र, सदर कार्यालयात फक्त २ महिला कर्मचारीच हजर असल्याचे त्यांच्या निर्शनास आले. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप असल्याचे तसेच राज्य माहिती आयोग कार्यालयात सव्वा दहा वाजेपर्यंत शुकशुकाट असल्याचे ‘आम आदमी पार्टी'च्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले.
कोकण भवनचे मुख्य प्रवेशद्वार तसेच रेल्वे स्टेशन बाजुच्या प्रवेशद्वारातून सकाळी ११.३० पर्यंत कर्मचारी कार्यालयात येत असल्याचे तसेच महाराष्ट्र शासन अशा पाट्या असलेल्या अधिकाऱ्यांची अनेक वाहने ११.३० पर्यंत कोकण भवनमध्ये प्रवेश करताना निदर्शनास आल्याचे ‘आप'ने कोकण विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच अधिकारीच जर कार्यालयीन शिस्त पालनाच्या बाबतीत बेफिकीर असतील तर कर्मचाऱ्याकडून कार्यालयीन वेळ पालनची अपेक्षा कसे ठेवणार? असा प्रश्न देखील ‘आप'ने उपस्थित केला आहे.
‘आम आदमी पार्टी'कडून इशारा...
येत्या नवीन नवीन वर्षात ‘आम आदमी पार्टी'चे कार्यकर्ते कुठल्याही दिवशी सकाळी कोकण भवनच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर हजर राहतील आणि सकाळी ९.४५ नंतर येणाऱ्या सर्व कर्मचारी-अधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करतील. तसेच त्यांचे फोटो राज्य शासनाकडे पाठविले जातील. त्याचप्रमाणे आकस्मिकपणे कार्यालयांना भेटी देऊन कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचे चित्रीकरण करुन ते सोशल मिडीयावर जनतेच्या माहितीसाठी व्हायरल केले जातील.
नागरिकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रम मोठा गाजावाजा करत राबवण्यात येत आहे. सदर उपक्रम स्तुत्य असला तरी राज्य सरकारच्या विविध सरकारी कार्यालयातील प्रमुख अधिकारी वर्ग त्यांच्या कार्यालयाच्या दारात येणाऱ्या नागरिकांना वेळेत उपलब्ध होत नसल्याची बाब या निमित्ताने ‘आम आदमी पार्टी'ने निदर्शनास आणून दिली आहे.
सर्व शासकीय कार्यालयांची निर्मिती जनतेच्या सेवा-सुविधांसाठी केलेली आहे. त्या ठिकाणी कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती जनतेच्या सेवेसाठी केलेली आहे. सर्व कर्मचारी-अधिकारी यांना प्राप्त होणारे वेतन आणि अन्य सुविधा नागरिकांच्या कररुपी पैशातून दिले जाते. त्यामुळेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सुलभ आणि वेळेत सुविधा प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळ आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे. - श्यामभाऊ कदम, आम आदमी पार्टी - नवी मुंबई.