फिटनेस विलंब दंड तात्काळ हटवा; अन्यथा आंदोलन
कल्याण : १५ वर्षाच्या आतील वाहने, ऑटो रिक्षा यांना लादण्यात आलेले जुलमी फिटनेस विलंब प्रति दिवस ५० रुपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरुन हटवण्याची मागणी ‘भाजपा वाहतूक संघटना'तर्फे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन ‘संघटना'च्या पदाधिकाऱ्यांनी ‘कल्याण'च्या आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, सदरचा जुलमी दंड न हटविल्यास आरटीओ कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
२० मे २०२४ च्या मध्यरात्री ‘परिवहन विभाग'च्या वतीने अचानकपणे वाहनांच्या, ऑटोरिक्षाच्या फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिवस ५० रुपये दंड आकारणी करुन राज्यातील तमाम वाहन चालक, गोरगरीब ऑटोरिक्षा चालकांची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे.
‘केंद्रीय परिवहन विभाग'च्या डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसुचनेला ‘मुंबई बस मालक संघटना'ने २०१७ मध्ये रिट याचिका दाखल करुन उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालय मध्ये यासंदर्भातील याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन २ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशाव्यये सदर याचिका खारीज करण्यात आल्या. याचा आधार घेत ७ मे २०२४ रोजी परिवहन विभाग, मुंबई यांनी फिटनेस विलंब प्रतिदिवस ५० रुपये दंड आकारणी करण्यास प्रारंभ केलेला आहे.
सदर नियम-अधिसूचनेतील कलम ११ (क) फक्त आणि फक्त १५ वर्ष जुन्या वाहनांच्या फिटनेस विलंबाकरिता अस्तित्वात आलेले आहे. परंतु, परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन १५ वर्षाच्या आतील वाहनांना, ऑटोरिक्षाला प्रतिदिवस ५० रुपये अतिरिक्त दंड वसूल करण्याचे फर्मान काढून गोरगरीब ऑटोरिक्षा चालकांची आर्थिक कोंडी करीत आहे. त्यामुळे १५ वर्षाच्या आतील ऑटोरीक्षास फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिवस ५० रुपये अतिरिक्त दंड लावू नयेत. वाहन पोर्टल वरील प्रतिदिवस ५० रुपये अतिरिक्त दंड तात्काळ हटवून राज्यातील तमाम ऑटोरिक्षा चालकांना दिलासा द्यावा. अन्यथा ‘संघटना'च्या वतीने ५० रुपये प्रतिदिन विलंब शुल्क रद्द होत नाही तोपर्यंत १८ जून पासून उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण (पश्चिम) समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ‘भाजपा वाहतूक संघटना'चे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संघटना'चे प्रदेशाध्यक्ष विल्सन काळपुंड, कल्याण पश्चिम अध्यक्ष चंद्रकांत वडतिले, कल्याण पश्चिम उपाध्यक्ष रमजान शेख, कल्याण पश्चिम संघटक दत्तात्रय कणसे, आदि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.