‘सिटी पार्क'मध्ये तिकीटांसाठी तासभर रांग
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ‘स्मार्ट सिटी' अंतर्गत नागरिकांना सिटी पार्क विरंगुळ्यासाठी उपलब्ध झाले आहे. उद्घाटनापासूनच या ‘सिटी पार्क'मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या सिटी पार्क प्रवेशासाठी महापालिका प्रशासनाने २० रुपये तिकीट ठेवल्यानंतरही नागरिक तिकीट काढून ‘सिटी पार्क'मध्ये फिरण्याचा बागडण्याचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे ३ मार्च रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी तिकीटाच्या रांगेत नागरिक जवळपास तासभर ताटकळत उभे होते. याबाबतची माहिती मिळताच ‘भाजपा'चे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी शहर उपाध्यक्ष सुधीर वायले आणि कार्यकर्त्यासह ‘सिटी पार्क'मध्ये जाऊन रांगेत असलेल्या नागरिकांना विना तिकीट ‘पार्क'मध्ये सोडले.
यानंतर महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांनी संताप व्यक्त केला असून नागरिकांना सुविधेचा लाभ घेण्यासाठी असे ताटकळत ठेऊ नका. असा इशाराही दिला आहे. सध्या ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे. सदर पर्याय देखील नागरिकांना प्रशासनाकडून उपलब्ध करुन देऊ शकते. पार्क सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तिकीट नक्क घ्यावे. मात्र, त्या प्रमाणात सुविधा द्याव्यात. ‘सिटी पार्क' येथील म्युझिकल फाऊंटन बंद असून याठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. लहान मुलांसाठी असलेली चित्रफित बंद आहेत. खेळणी अपुरी आहेत. साऊंड सिस्टम बंद आहे. अपुरे सुरक्षा रक्षक याकडे देखील वरुण पाटील यांनी लक्ष वेधले. सुविधा द्या आणि मग टिकीट घ्या, तसेच यापुढे नागरिकांची गैरसोय झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वरुण पाटील यांनी दिला.