ठाणे महापालिका तर्फे प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे  ः  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४वा वर्धापन दिन ठाणे महापालिका तर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी राष्ट्रध्वजवंदन केले. यावेळी ठाणे महापालिका सुरक्षा दल, अग्निशमन दल जवान, आपत्ती व्यवस्थापन दल जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. 

 ध्वजवंदन सोहळ्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सन्मान केला. यावेळी सुनीता खरे, भाग्यश्री कोचकर, अनिता काशिद, प्रतिभा जाधव, नंदा कारंडे, पोपट वाघचौरे, मच्छिंद्र बेडेकर, राजेंद्र मालुसरे, हरिश्चंद्र खुराटकर, सुजीतकुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, सुयोग्य पद्धतीने कचरा वर्गीकरण करणाऱ्या ठाणे शहरातील विराट सोसायटी, रिजन्सी हाईट्‌स सोसायटी, ॲकोलेड सोसायटी आणि कोरस टॉवर कॉम्प्लेक्स या चार गृहनिर्माण संस्थांचाही याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ध्वजवंदन सोहळ्यास, महापालिका परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्यासह सर्व महापालिका वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर, महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याशिवाय, महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

ठाणे शहरातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी, महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती आणि जनसंपर्क) उमेश बिरारी आदी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘नमो चषक गीत गायन' स्पर्धेला प्रारंभ