मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडीत
ठाणे : जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरु केली असून २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या काळात ४८८ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. तर १६७ मोटर जप्त करण्यात आल्या असून २४ पंपरुम सील करण्यात आली आहेत. दरम्यान, थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात १०० टक्के सवलत देण्याची योजना ३१ मार्चपर्यंत वाढविण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली आहे.
ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २२३ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये ८८ कोटी रुपयांची थकबाकी असून १३४ कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी २२ कोटी रुपयांची थकबाकी तर ५९ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण ८१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्च पर्यंत सुमारे १४१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडीत करावे, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी गत आठवड्यात पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरु करण्यात आली आहे.
प्रशासकीय आकारात १०० टक्के सूट...
जे घरगुती नळसंयोजन धारक ३१ मार्च २०२४च पर्यंत थकीत पाणी बील, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. सदर योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत, त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.
प्रभाग समिती खंडीत नळ जोडण्या
नौपाडा-कोपरी ८४
उथळसर ४९
वागळे ५४
लोकमान्य-सावरकर नगर ३७
वर्तकनगर ०९
माजिवडा-मानपाडा ०७
कळवा ४७
दिवा ७१
मुंब्रा १३०
एकूण ४८८