ठाणे मधील १५० शाळांमध्ये झाले सर्वंकष स्वच्छता अभियान

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी  २० मे रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील १५० शाळा आणि त्यांच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या ‘स्वच्छता अभियान'मध्ये मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर देण्यात आला.

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांमधील मतदान केंद्र, तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १७ मे रोजी सकाळी सर्व शाळांमध्ये सफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या ६२ शाळा आणि ८८ खाजगी शाळा अशा १५० शाळांचा समावेश होता.

सफाई मोहिमेची सुरुवात कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक-१६ येथे करण्यात आली. या शाळेतील मतदान केंद्रांची सफाई करण्यात आली. तसेच परिसरही स्वच्छ करण्यात आला.

अतिरिवत आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहायक आयुक्त सोपान भाईक, आदि वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सफाई मोहिमेत सहभागी झाले होते.

सर्व मतदान केंद्र आणि परिसराची व्यवस्थित सफाई करण्यात यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी अतिरिवत आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी दिल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

१० आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, तेव्हा विचार करूनच मतदान करा - बच्चू कडू