‘शासन आपल्या दारी' अभियानची पूर्वआढावा बैठक संपन्न

‘अभियान' यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी १०० टक्के योगदान द्यावे -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी' असा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

‘शासन आपल्या दारी' या अभियानानिमित्त पूर्वआढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
काही कारणास्तव सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक आणि शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा. तसेच जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी' अशी अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व शासकीय विभागांच्या योजनांचा आढावा घेतला पाहिजे. योजना मर्यादित न ठेवता सर्व समावेशक असाव्यात. त्यासंबंधीचा कार्यक्रम राज्यातील सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीकोनातून सर्वांनी काम करावयाचे आहे. याचा सकारात्मक परिणाम जनतेवर झाला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले.

सदर उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. या ‘अभियान'च्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार-स्वयंरोजगार, कामगार, दिव्यांग यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत, असेही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

सदर उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी' उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करु, असा विश्वास शिनगारे यांनी शेवटी व्यक्त केला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात राजस्थान मधील डाळींब आवक मध्ये वाढ