मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया, मतदानाची टक्केवारी वाढवूया!
ठाणे : येत्या २० मे रोजी ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ४ मे रोजी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क'ला भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी सदर पार्क कल्पतरु डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. सोबत मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रुपातील मॅस्कॉट (शुभंकर) देखील होता. मतदान नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिवत आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनिष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांबरे, वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, आदि उपस्थित होते.
नागरिकांनीही आयुवतांच्या सदर आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरु असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
‘जिल्हा निवडणूक कार्यालय'कडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकानेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडीया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.