ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
१७ दिवसांपासून कोपरखैरणे परिसरात वीज वारंवार गायब
वाशी: मागील काही दिवसांपासून कोपरखैरणे विभागात राहणाऱ्या नागरिकांना रात्री-अपरात्री खंडीत होणाऱ्या विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरु असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही आता पारा चढत आहे.
नवी मुंबई शहरात तापमानाचा पारा चाळीशीच्या पार जात आहे. रात्री देखील ३० ते ३३ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच नागरिक एसी, कूलर यांचा गारवा घेत आहेत. त्यातच कोपरखैरणे सेक्टर-१७,१८,१९ या भागासह कोपरखैरणे गावात विजेच्या लपंडावाचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था नागरिकांची होत आहे. मागील १७ दिवसांपासून कोपरखैरणे सेक्टर-१९ मध्ये रात्री बत्ती गुल होण्याचा प्रकार वाढला आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने लहान मुले-मुली, वृध्द, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. यामुळे महावितरण विरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. प्रतिवर्षी उन्हाळा सुरु होताच ‘महावितरण'चा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. तर उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने रोहित्रवर आणि वीज वाहिन्यांवर ताण येऊन बिघाडाच्या घटना घडतात, असे महावितरण द्वारे सांगण्यात येत आहे. मात्र, ऐन उकाड्याच्या दिवसात ‘महावितरण'च्या भोंगळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्यात वीज वापर मध्ये वाढ
- उन्हाचा पारा चढताच नागरिकांकडून घर, कार्यालयातील पंखा तसेच एसी यांचा वापर वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असते. त्यातच अनेक भागांमध्ये १५ ते २० वर्षांपूर्वीच्या कमी क्षमतेच्या वीज वाहिन्या असल्याने त्या जळण्याच्या देखील घटना घडत असतात. मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅस पाईप लाईन, पाणी पाईप लाईन, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे या अनेक विकासकामांसाठी खोदकामे करताना भूमिगत वीज वाहिन्यांना धक्का लागून वीज खंडित होते. नवी मुंबई परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे देखील विजेची मागणी वाढली आहे. बैठ्या चाळीत सध्या चार ते पाच माळ्यांची कामे झाली आहेत. पूर्वी एक कुटुंब ज्या जागेत होते तिथे वाढीव बांधकामा मुळे पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास आली आहेत.त्याचा भार विजेवर होऊ लागला आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, उन्हाळ्यात सातत्याने वीज जात असल्याने नागरीक घामाघूम होत आहेत. त्यामुळे ‘महावितरण'ने कोपरखैरणे परिसरात मागणीप्रमाणे वीज पुरवठा केला तर वीज वाहिन्यांवरील ताण कमी होणार आहे. - सत्यवान गायकवाड, रहिवाशी - कोपरखैरणे.
नवी मुंबई शहरात सुरु असणाऱ्या विविध प्राधिकरणांच्या खोदकामांमुळे भूमिगत असणाऱ्या ‘महावितरण'च्या वीज वाहिन्यांना धक्का बसला जातो. त्यामुळे नेमका बिघाड कुठे आहे ते देखील काही वेळेस कळत नाही. मात्र, वारंवार बिघाड होत असलेल्या ठिकाणच्या वीज वाहिन्या बदलल्या जात आहेत. - संजय पोळ, कार्यकारी अभियंता - कोपरखैरणे, महावितरण कंपनी.