मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
बामणडोंगरी, खारकोपर रेल्वे स्थानकामधील सुलभ शौचालय बंद
उरण : ‘सिडको'चा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली नेरुळ-उरण रेल्वे सेवा चालू झाली असून, प्रवांशाना उरण ते नेरुळ दरम्यान प्रवास करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. मात्र, या मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकातील सार्वजनिक सुलभ शौचालय बंद असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, या स्थानकातील सुलभ शौचालय बंद असल्याने महिलांची नैसर्गिक विधीसाठी मोठी कुचंबणा होत आहे.
उरण ते नेरुळ रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन चालू होवून कमीत कमी दीड वर्ष झाले असून, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकामधील ‘सिडको'चे सुलभ शौचालय बंद असल्याने प्रवाशांना शौचालय अभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन मधील सुलभ शौचालय ‘सिडको'ने लवकरात लवकर चालू करावे, अशी मागणी या रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे रेल्वे प्रवाशी करीत आहेत.
‘सिडको'ने निर्माण केलेले वाशी आणि बेलापूर रेल्वेस्थानक आशिया खंडामध्ये स्टेशन नंबर-१ आहे. मात्र, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकामध्ये सुलभ शौचालयाची व्यवस्था नसल्याने या स्थानकात येणारे-जाणारे रेल्वे प्रवासी, अपंग, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, वृध्द महिला-पुरुष यांचे शौचालयामध्ये जाण्यासाठी हाल होत आहेत. विशेष म्हणजे सिडको व्यवस्थापक मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांन विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकामधील सुलभ शौचालय लवकरात लवकर जनतेसाठी चालू करुन या रेल्वे स्थानकात येणाऱ्या जनतेचे हाल थांबवावेत, अशी मागणी बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकामधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे.