मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी केली हात की सफाई

नवी मुंबई : नवी मुंबईत वाशीमध्ये दाखल झालेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये असलेल्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी हात की सफाई करून ९ जणांचे तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व तीन जणांचे मोबाईल फोन असा तब्बल पावणे चार लाखांचां ऐवज  लंपास केल्याचे उघडकिस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा काढली होती. सदरची पदयात्रा शुक्रवारी सकाळी नवी मुंबई दाखल झाली होती. या पदयात्रेमध्ये राज्यभरातील लाखो मराठा बांधव हजारो वाहनांसह सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने संपूर्ण मराठा समाजातील बांधव या ठिकाणी जमले होते. या सभेसाठी मनोज जरांगे पाटील हे १ वाजता व्यासपीठावर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या गोंधळात काही प्रमाणात धक्काबुक्की झाली. याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून ऐरोलीतून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले संजीव पिंगळे (५५) तसेच कोपरखैरणेतून आलेले ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद जाधव या दोघांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली. त्यानंतर पिंगळे आणि जाधव यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

दरम्यान, दुपारी बारा वाजताची अपूर्ण राहिलेली मनोज जरांगे पाटील यांची सभा सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा वाशीतील शिवाजी चौकात सुरू झाली. याही वेळी मराठा बांधवांनी वाशीतील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने झालेल्या गोंधळात व धक्काबुक्कीत चोरट्यांनी संधी साधून आणखी ७ जणांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच तीन जणांचे मोबाईल फोन चोरले. या सर्वांनी देखील वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशा पद्धतीने मराठा समाजाच्या मोर्चामध्ये घुसलेल्या चोरट्यांनी नऊ जणांचे तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याच्या चैन तसेच तीन मोबाईल फोन असा तब्बल पावणे चार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर वाशी पोलिसांनी या सर्वांची तक्रार एकत्रित करून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वर्षभरात नवी मुंबई मध्ये ड्रग्ज माफीयांविरुध्द धडक कारवाई