ग्रंथालय इमारत उभी राहण्यापूर्वीच खचला पाया

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल ३३.३१ कोटी रुपये खर्च करुन सानपाडा, सेक्टर-११ येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या ग्रंथालय इमारतीचा पाया रचताना उभारण्यात आलेल्या पायलिंगचे पिलर या बांधकाम साईटवर उभ्या असलेल्या जेसीबी मशीनवर कोसळण्याची घटना घडली आहे.

सदर दुर्घटनेमुळे या ग्रंथालय इमारतीच्या शेजारी असलेल्या भूमी पॅराडाईज को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या इमारतीला देखील धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांनी ग्रंथालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करत या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, आयआयटी तज्ञांना बोलविण्यात आले असून त्यांच्यामार्फत इमारतीच्या कामकाजाची चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

सानपाडा, सेक्टर-११ येथील भूखंड क्र.१ वर नवी मुंबई महापालिका तर्फे ३३ कोटी रुपये खर्च करुन मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या उभारणीचे काम १७ एप्रिल २०२३ रोजी सुरु करण्यात आले. सध्या या इमारतीचा पाया उभारणीसाठी पायलिंग करण्याचे काम सुरु आहे. सदर पायाभरणीचे काम सुरु झाल्यानंतर या परिसरातील माजी नगरसेविका ऋचा पाटील यांनी सदर बांधकामाबाबत गत २६ सप्टेंबर २०२३ रोजी आक्षेप नोंदवला होता. तसेच मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून या बांधकामासाठी शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वापरले जात असल्याची बाब ऋचा पाटील महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

५ मार्च रोजी रात्री १० वाजता ग्रंथालय इमारतीच्या बांधकाम साईटवर भूमी पॅराडाईज इमारती लागत उभारण्यात आलेले पायलिंग कोसळले. या दुर्घटनेमुळे भूमी पॅराडाईज इमारतीची सुरक्षा भिंत देखील कोसळण्याच्या मार्गावर असूनया इमारतीला देखील धोका निर्माण झाल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी केली आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे येथील बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम कंत्राटदार मे. अश्विनी इफ्रा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांनी निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप करतानाच ग्रंथालय इमारतीच्या कामाचे महापालिका आयुक्तांनी थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी माजी नगरसेविका ऋचा पाटील आणि भूमी पॅराडाईज सोसायटीमधील रहिवाशांनी केली आहे.

मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. बांधकामासाठी नाल्याचे पाणी वापरले जात असून इमारतीच्या बांधकामासाठी तेथील फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आले असून पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. तसेच रात्री उशीरापर्यंत येथे बांधकाम सुरु राहत असल्याने शेजारील इमारतीला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी येथील रहिवाशांनी केल्या होत्या. तसेच सदर बांधकामासाठी अनधिकृतरित्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने माझ्या आणि भूमी पॅराडाईज मधील रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेतली नाही. -ऋचा पाटील, माजी नगरसेविका-शिवसेना (शिंदे गट), सानपाडा.

मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेची पाहणी आणि इमारतीच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी आयआयटी तज्ञांना बोलावण्यात आले. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच संबंधितांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे शहरासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे प्रकाशन