विज्ञान प्रदर्शन, रायफल शुटींग मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासोबतच त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावरही भर दिला जात आहे. या अनुषंगाने विविध कला, क्रीडा प्रकारांप्रमाणेच विज्ञान प्रकल्प स्पर्धांमध्येही महापालिका शाळांतील विद्यार्थी कर्तृत्व गाजविताना दिसत आहेत.
नुकत्याच ३१ व्या ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद'मधील विज्ञान प्रकल्प स्पर्धेमध्ये ३६ जिल्ह्यांमधील ४५ हजारहून अधिक विद्यार्थी प्रकल्पाची नोंदणी झाली होती. त्यामधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली असून त्यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक-४६, गोठीवली शाळेतील प्रिती राठोड आणि पल्लवी सोळंके या २ विद्यार्थिनींनी साकारलेल्या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे. त्याबद्दल या दोन्ही विद्यार्थिनींचा महापालिका मुख्यालय येथेे विशेष समारंभात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

सदर विद्याथिनींनी तयार केलेल्या ‘विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन(Disposable Female Urination Device)' या प्रकल्पाची तालुका पातळीवरुन जिल्हा पातळीवर आणि पुढे जिल्हा पातळीवरुन राज्य पातळीवर आणि त्यापुढे राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे गोठीवली शाळेतीलच अंश शर्मा आणि विलास गुरव या २ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बहुउपयोगी खुर्ची' या प्रकल्पाची महापालिका स्तरावर उत्तम प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या २ विद्यार्थिनींचाही विशेष सन्मान...
याशिवाय नवी मुंबई महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांमध्ये नैपुण्य असणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उत्त्म दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जात आहे. यामधील रायफल शुटींग या ऑलिपिंक स्तरावरील मान्यताप्राप्त खेळाच्या प्रशिक्षण सुविधा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या नुतन चौधरी आणि अंशिका प्रजापती या २ महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘ स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे व्यासपीठावर उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ता दुभाजकांतील झाडांचा पाणी पुरवठा खंडित