म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
तुर्भे येथे वेश्या व्यवसाय ; शिवसेना तर्फे पोलीस ठाणेवर मोर्चा
तुर्भे : तुर्भे गावातील काही भाग तसेच तुर्भे जनता मार्केट लगत चालत असलेल्या वेश्या व्यवसायाच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) तर्फे एपीएमसी पोलीस ठाणेवर १४ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता.
तुर्भे गावातील काही भाग तसेच तुर्भे जनता मार्केट लगत होणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे तुर्भे गाव आणि जनता मार्केट मधील व्यापारी, मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला, स्थानिक रहिवासी महिला, शाळा-कॉलेज मधील मुलींना होत असलेल्या त्रासाबद्दल शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख (शिंदे गट) अतिष घरत, शिवसेना व्यापारी संघटना यांच्या द्वारे एपीएमसी पोलीस ठाणेवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा नंतर ‘एपीएमसी पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना अतिष घरत यांनी निवेदन दिले.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून तुर्भे जनता मार्केट, तुर्भे सेक्टर-२३, सेक्टर-२४, शिकारा हॉटेल परिसरात देह विक्रीचा धंदा फोफावत चालला आहे. त्यामुळे तुर्भे परिसरात राहणारे व्यापारी, कामगार तसेच नवी मुंबई शहरातून मार्केटमध्ये खरेदीला येणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तुर्भे सेक्टर-२२ आणि सेक्टर-२४ मधील वॉकींगला जाणाऱ्या महिलांना देखील वाईट नजरेने पाहिले जात आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करुन देखील त्या तक्रारींची दखल घेऊन हवी तशी कारवाई होताना दिसत नाही. कारवाई झालीच तरी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना लगेच सोडण्यात येते. त्यामुळे त्या देहविक्रीचा त्यांचा व्यवसाय पुन्हा चालु करतात. त्यामुळे नागरीकांना अशी शंका येते की, त्यांच्या पाठी कोणाचा तरी मोठा हात आहे. यामुळे पोलीस खात्याचे नावही खराब होत आहे, असे निवेदनात नमूद करुन, ‘योग्य ती चौकशी करुन देहविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करुन सदर ठिकाणचा देहविक्री व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्यात यावा', अशी मागणी अतिष सोमा घरत यांनी केली आहे. दरम्यान, ठोस निर्णय घेऊन तुर्भे गावातील काही भाग तसेच तुर्भे जनता मार्केट लगत चालणारा वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच सदर ठिकाणी बिट चौकी २४ तास कार्यरत राहील, असे आश्वासन अजय शिंदे यांनी अतिष घरत यांना दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शिवसेना व्यापारी संघटना जिल्हाप्रमुख करण जैन, जेष्ठ शिवसैनिक सोमाशेठ घरत, व्यापारी संघटना नवी मुंबई सचिव मोहन चौधरी, ॲड. बिपीन घरत,युवा सेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ वाघमारे, युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पोवार, शिवसेना पदाधिकारी दिव्या राठोड, शिवसेना महिला आघाडी उपशहरप्रमुख अंजना भोईटे यांच्यासह शिवसैनिक, मार्केट मधील व्यापारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.