मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
इर्शाळवाडी पुनरावृत्ती होण्याची शक्यता?
नवी मुंबई मधील आदिवासी पाड्यांना अतिक्रमणाचा विळखा
वाशी : नवी मुंबई शहराच्या पूर्व भागातील डोंगराच्या पायथ्याशी येथील मुळ आदिवासी पाडे आहेत. मात्र, येथील भूमाफीयांनी या आदिवासी पाड्यांशेजारी डोंगर पोखरुन अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे दरवर्षी डोंगर पोखरण्याचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याची भीती नवी मुंबई मधील आदिवासींनी व्यक्त केली आहे.
माळीण, तळीये नंतर आता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुवयातील डोंगराखालील इर्शाळवाडी या आदिवासी पाड्यावर दरड कोसळण्याची घटना १९ जुलै रोजी रात्री घडली. या घटनेत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २१ नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, नवी मुंबईतील आदिवासींच्या मनात देखील धडकी भरली आहे. आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे. मात्र, याच आधुनिक नवी मुंबई शहरात आजही येथील मूळ आदिवासींचे वास्तव्य आहे. नवी मुंबई शहराच्या पूर्व दिशेला दिघा इलठण पाडा, रबाळे संभाजी नगर, अडवली-भुतवली, पावणे, खैरणे, तुर्भे, शिरवणे, सीबीडी फणसपाडा पर्यंत आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या आदिवासी पाड्यांलगत भूमाफीयांनी अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली आहे. सदर अतिक्रमणे करताना भूमाफीयांनी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले आहेत. याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस या अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. मात्र, अतिक्रमणाची परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊन आदिवासी पाड्यातील घरे ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची भीती येथील आदिवासींनी व्यक्त केली आहे.
---------------------------------
नवी मुंबई मधील डोंगरात पिढ्यानपिढ्या आदिवासींचे वास्तव्य असून, आदिवासी येथील निसर्गाचे संरक्षण करीत आलेले आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून डोंगर पोखरुन आदिवासी पाड्यांना अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या अतिक्रमणाची दखल घेतली नाही तर भविष्यात ‘इर्शाळवाडी'ची पुंनरावृती नवी मुंबई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - कृष्णा वड, अध्यक्ष - वारलीपाडा घर बचाव समिती, नवी मुंबई.