मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उष्णतेच्या लाटेने लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका
नवी मुंबई : देशात उष्णतेची लाट पसरली असून नवी मुंबईचा पारा देखील 40 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत 3-15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये डिहायड्रेशनचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे आपली मुलं दररोज किमान 10 ग्लास पाणी पित असल्याची खात्री पालकांनी करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याबरोबरच आहारात द्रव पदार्थांचे सेवन, ओरल रिहायड्रेटिंग तसेच दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे अशा सुचना डॉक्टरांकडुन करण्यात आल्या आहेत.
उष्णतेची लाट ही सर्वच वयोगटातील व्यक्तीवर परिणाम करत असून प्रौढांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये मूर्च्छा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि बेशुद्ध पडणे असे प्रकार होत असल्याचे आढळून येत आहेत. घराबाहेर खेळणे आणि व्यायाम केल्याने मुलांच्या शारीरीक विकासात मदत असली तरी, अति उष्णतेमध्ये ही क्रिया करणे मुलांसाठी योग्य नाही. उच्च तापमान आणि अति उष्णतेमुळे मुले आजारी पडतात कारण त्यांचे निर्जलीकरण होते (अत्याधिक घाम येणे), उष्णतेमुळे थकवा येतो आणि उष्माघातासारखी समस्या उद्भवू शकते.
निर्जलीकरणामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे मुलामध्ये मळमळ आणि उलट्या , थकवा, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. तीव्र उष्णतेमुळे चिडचिड होऊन श्वास घेण्यास त्रास होतो आणि एखाद्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मुलांना ठराविक अंतराने द्रव पदार्थांचे सेवन करण्यास देणे, खेळताना ठराविक अंतराने विश्रांती घेण्यास सांगणे, दिवसातून किमान 10 ते 13 ग्लास पाणी पिण्यास देणे, मुलांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे, होममेड ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन बनवून ते मुलाला वेळोवेळी पाजणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांकडुन देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दुपारच्या उन्हात मुलांना घराबाहेर पाठवू नये विशेषत: दुपारी 12 ते 4 या वेळेत खेळणे किंवा व्यायाम करणे टाळावे, दुपारच्या वेळेत शाळेत किंवा बाहेर जाताना टोपी घालावी तसेच छत्रीचा वापर करावा. मुलांना हलक्या रंगाचे सैल सुती कपडे घालावे असेही डॉक्टरांनी उष्णतेपासुन बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.
डॉ.संजू सिदाराद्दी (बालरोगतज्ञ आणि नवजात रोग तज्ञ )
गत महिन्यापासून डिहायड्रेशनच्या समस्येने पिडीत बालरुग्णांची संख्या वाढली आहे. खेळण्याच्या नादात मुले अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि कार्बोनेटेड पेय किंवा शर्करायुक्त पेयांचे सेवन करणे गरजेचे आहे.
डॉ वृक्षल शामकुवर (पीआयसीयू प्रमुख आणि बालरोग तज्ञ)
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे हाच डिहायड्रेशन दूर करण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे. डिहायड्रेशन हे घरच्या घरी ठिक केली जाऊ शकते, डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास बाळाला ओरल रिहाइड्रेशन सोल्युशन अर्थात ओआरएस द्यावे. कधी कधी साधे पाणी पुरेसे नसते अशावेळी साखर, मीठ आणि पाण्याचे मिश्रण असलेले पाणी फायद्याचे ठरते.